Abhijeet Dipke: कोणत्या पक्षात जाणार? भाजपच नाही काँग्रेसचाही अंदाज चुकला, अभिजीत दिपके यांचा मोठा खुलासा
CJP Protest Abhijeet Dipke: कॉक्रोच जनता पार्टी या अवघ्या दोन महिन्याच्या डिजिटल पक्षाने देशात क्रांती घडवली. मोदी सरकारच्या 12 वर्षांत पहिल्यांदाच एका केंद्रीय मंत्र्याची विकेट पडली. संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके यांचे आता पुढचं पाऊल काय असेल याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. ते राजकारणात उडी घेणार का? ते कोणत्या पक्षात जाणार याची चर्चा सुरू असतानाच अनेकांचे अंदाज उडवणारा खुलासा दिपके यांनी केला आहे.

काक्रोच जनता पार्टी या अवघ्या दोन महिन्याच्या डिजिटल पक्षाला देशातील तरूणाईने डोक्यावर घेतले. जेन झी आणि अल्फाच नाही जुन्या पिढीनेही त्यांच्या आंदोलन उचलून धरले. CJP ने जंतरमंतरवर ठिय्या दिला. ऊन, वारा, भयंकर गर्मी, पावसाची तमा बाळगली नाही. आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न फसला. सरकारला नमते घ्यावे लागले. तत्कालीन शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला. प्रस्थापित पक्षांना इतक्या वर्षात जो दबाव तयार करता आला नाही. सीजेपीने ते करून दाखवले. या पक्षाचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके हे राजकारणात उडी घेणार अशा चर्चा सुरू असतानाच त्यांनी मोठा खुलासा केला आहे.
रिस्पॉन्स ग्रुप स्थापन करणार
आजतक या वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी भविष्यातील वाटचाल कशी असेल याचा खुलासा केला. अभिजीत दिपके यांनी स्पष्ट केले की ते कोणत्याही राजकीय पक्षात जाणार नाहीत. ते रिस्पॉन्स ग्रुप, प्रतिसाद समूह तयार करतील. त्यांच्या आंदोलनाला राजकीय पक्षांकडून नाही तर जनतेचे समर्थन मिळाल्याचे दिपके यांनी सांगितले. आपण कोणताही राजकीय पक्ष स्थापन करणार नाही. तर एक दबाव गट म्हणून विद्यार्थी आणि तरुणांचे मुद्दे उचलत राहू असे दिपके म्हणाले. आंदोलन नेहमी लोकशाही मार्गाने आणि शांततापूर्ण असेल हे सांगायला दिपके विसरले नाहीत.
उद्धव ठाकरेंचा दिपकेंना फोन
दरम्यान आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिजीत दिपके यांच्या कुटुंबियांशी संपर्क साधला. ठाकरे यांनी अभिजीत दिपकेंच्या आई-वडिलांना फोन केला. माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी फोनवरून बातचीत करून दिली. त्यांनी सीजेपीच्या आंदोलनाच्या यशाबद्दल शुभेच्छा दिल्या. त्यांनी अभिजीत दिपके याच्या लग्नाबाबतही विचारपूस केली.
राधाकृष्ण विखे पाटील यांची टीका
अभिजीत दिपके यांनी भाजप नेत्यांनी कुटुंबियांना आणि आपल्याला धमकावल्याचा आरोप काल माध्यमांशी बोलताना केला होता. त्यावर जलसंपदा मंत्री आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे यांनी कोणी धमकी दिली ते नाव सांगावे, असे दिपकेंना आवाहन केले. संसदेत विद्यार्थ्यासाठी कायदा देखील झाला. मात्र काँग्रेस केवळ आंदोलनाच्या आडून राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहे. सरकारची भूमिका योग्य असताना दीपकेनी अशी वक्तव्य करणे चुकीचे आहे. संदिग्धता निर्माण करण्यात अर्थ काय असे म्हणत राजकीय पक्षाकडून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका त्यांनी केली. ज्यांचा जनाधार गेलाय ते आंदोलनाच्या माध्यमातून राजकारण करताना दिसत आहे असा टोलाही त्यांनी काँग्रेससह इतर पक्षांना लगावला.