
भाजपच्या वतीने आज मुंबईत विजयी संकल्प मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे महत्त्वाचे नेते हजर होते. या मेळाव्यात केलेल्या भाषणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत महायुतीचा विजय होणार असा विश्वास व्यक्त केला आहे. तसेच उद्धव आणि राज ठाकरे यांच्या ठाकरे ब्रँडवर सडकून टीका केली आहे. फडणवीस नेमकं काय म्हणाले ते जाणून घेऊयात.
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या पॅनलचा एकही उमेदवार निवडून आला नव्हता. या निवडणुकीपूर्वी राज आणि उद्धव ठाकरे यांनी ही युती म्हणजे ठाकरे ब्रँड असं बोललं जात होतं. यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, बेस्टची निवडणूक होती, आम्ही सांगितलं कशाला पक्षावर लढायचं. पण काहीजण म्हणाले आमचा ब्रँड आहे. आमचे शशांक राव, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांनी ब्रँडचा वाजवला बँड, बँड-बाजा वाजला अशा शब्दात ठाकरेंवर सडकून टीका केली आहे.
पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हा ब्रँड होता, तुम्ही ब्रँड नाहीत. नुसतं नाव लावल्याने कुणी ब्रँड होत नाही. आमचा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. त्यामुळे आमच्याकडे चहा विकणारा जगामध्ये जागतिक ब्रँड म्हणून जगात स्थापित झाला आहे. अशा प्रकारचा ब्रँड निर्माण करणारा आमचा पक्ष आहे. त्यामुळे आम्हाला कुणी ब्रँड सागू नये. जगातला सर्वात मोठा ब्रँड आमच्याकडे आहे. त्याचं नाव नरेंद्र दामोदरदास मोदी आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीत महायुतीचाचं झेंडा फडकणार असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते म्हणाले की, ‘आज माझे शब्द लिहून घ्या. व्हिडीओ रेकॉर्ड करा. तो जपून ठेवा आणि नंतर सगळीकडे दखवा की काहीही झालं तरी मुंबईच्या महापालिकेच्या निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार आहे. काहीही झालं तरी मुंबई पालिकेवर महायुतीचंच सरकार येणार’.