
स्वित्झर्लंडमधील दावोसमध्ये सुरु असलेल्या जागतिक आर्थिक मंचाच्या (World Economic Forum 2026) वार्षिक परिषदेत महाराष्ट्राने गुंतवणुकीचा विक्रम प्रस्थापित केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पहिल्याच दिवशी विविध जागतिक आणि भारतीय कंपन्यांसोबत तब्बल 14.5 लाख कोटी रुपयांचे सामंजस्य करार (MoUs) केले आहेत. या माध्यमातून महाराष्ट्रात साधारण 15 लाख नवीन रोजगार निर्माण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
दावोसमध्ये फक्त उद्योगच नाही, तर महाराष्ट्रातील शहरांना जागतिक दर्जाचे बनवण्यासाठी सरकारने महत्त्वाच्या जागतिक संस्थांशी करार केले आहेत. मुंबईसाठी डिजीटल ट्वीन प्रोजेक्ट केला जाणार आहे. यानुसार लंडनच्या अर्बन फ्युचर्स कलेक्टिव्हसोबत मिळून मुंबईचा डिजिटल नकाशा तयार केला जाईल, ज्यामुळे शहराचे नियोजन आणि आपत्ती व्यवस्थापन अधिक सोपे होईल. त्यासोबतच जर्मनीच्या टेक्निकल युनिव्हर्सिटी ऑफ म्युनिकसोबत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी करार करण्यात आला आहे. तसेच सिंगापूरच्या सेम्बकॉर्प डेव्हलपमेंट कंपनीसोबत कार्बन उत्सर्जन कमी करणाऱ्या औद्योगिक उद्यानांसाठी तंत्रज्ञान भागीदारी केली आहे.
| कंपनी / संस्था | क्षेत्र | गुंतवणूक (अंदाजे) | अपेक्षित रोजगार | प्रदेश |
| SBG ग्रुप | लॉजिस्टिक्स | $२० अब्ज | ४,५०,००० | मुंबई महानगर प्रदेश (MMR) |
| अल्टा कॅपिटल / पंचशील रिअॅल्टी | रिअल इस्टेट | $२५ अब्ज | २,५०,००० | महाराष्ट्र |
| लोढा डेव्हलपर्स लिमिटेड | IT / डेटा सेंटर्स | ₹१,००,००० कोटी | १,५०,००० | मुंबई महानगर प्रदेश (MMR) |
| के. राहेजा कॉर्प | रिअल इस्टेट / इन्फ्रा | $१० अब्ज | १,००,००० | महाराष्ट्र |
| सुमितोमो रिअॅल्टी | रिअल इस्टेट | $८ अब्ज | ८०,००० | महाराष्ट्र |
| IISM ग्लोबल | पायाभूत सुविधा | $८ अब्ज | ८०,००० | महाराष्ट्र |
| सुरजागड इस्पात लिमिटेड | पोलाद (स्टील) | ₹२०,००० कोटी | ८,००० | गडचिरोली / विदर्भ |
| योकी ग्रीन एनर्जी | नवीकरणीय ऊर्जा | ₹४,००० कोटी | ६,००० | पालघर / MMR |
| BFN फोर्जिंग्स | पोलाद (स्टील) | ₹५६५ कोटी | ८४७ | पालघर / MMR |
या गुंतवणुकीत रिअल इस्टेट, आयटी, लॉजिस्टिक्स आणि ऊर्जा क्षेत्रातील बड्या कंपन्यांचा समावेश आहे.
लॉजिस्टिक्स : SBG ग्रुपसोबत २० अब्ज डॉलर्सचा करार करण्यात आला आहे. त्यामुळे ४.५० लाख रोजगार निर्मिती होईल.
रिअल इस्टेट व इन्फ्रा: सुमितोमो (८ अब्ज डॉलर्स), के. राहेजा कॉर्प (१० अब्ज डॉलर्स) आणि अल्टा कॅपिटल/पंचशील रिअॅल्टी (२५ अब्ज डॉलर्स) यांच्याशी मोठे करार करण्यात आले आहेत.
डेटा सेंटर्स: लोढा डेव्हलपर्ससोबत १ लाख कोटींची गुंतवणूक करण्यात आली असून १.५० लाख रोजगार निर्मिती केली जाणार आहे.
ऊर्जा व स्टील : योकी ग्रीन एनर्जी (४,००० कोटी), सुरजागड इस्पात (२०,००० कोटी) आणि BFN फोर्जिंग्स (५६५ कोटी) इतका करार करण्यात आला आहे.
आता या गुंतवणुकीमुळे महाराष्ट्राच्या 1 ट्रिलियन डॉलर इकोनॉमीच्या स्वप्नाला गती मिळणार आहे. जागतिक आर्थिक मंचाच्या वार्षिक परिषदेला अजून तीन दिवस बाकी आहेत. त्या आगामी दिवसांत मॅन्युफॅक्चरिंग आणि सेवा क्षेत्रात आणखी काही मोठे करार होण्याची शक्यता आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.