
मुंबई | 6 ऑक्टोबर 2023 : नांदेडच्या वैद्यकीय महाविद्यालयातील घटनेवरुन, माजी आणि आजी मुख्यमंत्री आमनेसामने आले आहेत. औषध खरेदीत सरकारचेच दलाल असून CBI चौकशी करा, अशी मागणी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. तर कोरोनात लोक मरत होते आणि उद्धव ठाकरे घरात बसून नोटा मोजत होते, असा तिखट पलटवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलाय. नांदेडमध्ये 48 तासांत 41 जणांचा मृत्यू झाला, ज्यात 18 नवजात बालकांचा समावेश आहे. औषधांच्या कमरतेमुळं जीव गेल्याचा आरोप होतोय. मात्र पालकमंत्रिपदासाठी मारामाऱ्या सुरु आहेत. औषधं खरेदीसाठी पैसे नाहीत, परदेशी वाऱ्या सुरु आहेत. भ्रष्टाचाराची साथ आल्यानंच बळी चाललेत, असा हल्लाबोल ठाकरेंनी केला.
नांदेडच्या घटनेनंतर वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ आणि पालकमंत्री गिरीश महाजन वैद्यकीय महाविद्यालयात आले आणि इथल्या घटनेचा आढावा घेतला. मात्र, मुख्यमंत्री शिंदे किंवा दोन्ही उपमुख्यमंत्री आले नाहीत. त्यामुळं एक फूल, दोन हाफ कुठं आहेत? अशी बोचरी टीका उद्धव ठाकरेंनी केलीय.
सरकार म्हणतंय की औषधांचा तुटवडा नाहीच आणि एक एका मृत्यूची चौकशी करु. त्यासाठी चौकशी समितीही स्थापन झालीय. अहवालही एक-दोन दिवसांत अपेक्षित आहे. असे अहवाल अनेक घटनांमध्ये याआधीही अनेक आलेत. पुढं काय होतं हे सरकारलाही माहिती नसेल. मात्र नवी घटना घडली की अशाच प्रकारे सत्ताधारी विरोधक आमनेसामने येतात. महाराष्ट्राला पॉलिटिकल हंगामा पाहायला मिळतो. पण ज्याच्या घरचा जीव गेला त्याची कोणाला काही पडलेली नाही.