Abhijeet Dipke : यांनी लायकी काढली स्वतःची..गोकुळमध्ये जे घडलं त्यावर अभिजीत दीपकेंचा संताप, सरकारवर हल्लाबोल
Abhijeet Dipke : कॉकरोच जनता पार्टीने उद्या नागपूरमध्ये मोर्चा आयोजित केला आहे. CJP चे संस्थापक अभिजीत दिपके छत्रपती संभाजीनगर वरून नागपूरकडे रवाना झाले आहेत. त्यावेळी त्यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना सरकारवर हल्लाबोल केला.

उद्या नागपूरमध्ये कॉकरोच जनता पार्टीचा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. त्यासाठी CJP चे संस्थापक अभिजीत दिपके छत्रपती संभाजीनगर वरून नागपूरकडे रवाना झाले आहेत. “उद्या संविधान दिवस आहे. जो खूप महत्त्वपूर्ण आहे. फक्त सीजेपीसाठी नाही तर संपूर्ण देशासाठी, आपला देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानावर चालत आहे. आम्हाला एक संदेश द्यायचा आहे, जे काही लोक सत्तेत बसले आहेत जे संविधान विरोधी मानसिकतेचे आहेत. ज्यांनी सगळ्या संस्था हायजॅक करून संविधानाला पूर्णपणे इग्नोर करून, जी तानाशाही चालवली आहे, त्याच्या विरोधात हा मोर्चा असणार आहे. आम्ही तिथे एकत्र येऊन हा संदेश देऊ की हा देश फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर चालेल. जो तानाशाह बसला आहे, त्याच्या मनावर चालणार नाही” असं अभिजीत दीपके म्हणाले.
तुमच्या या मोर्चाला परवानगी आहे का? यावर अभिजीत दीपके म्हणाले की, “आम्हाला परवानगी आहे. कसल्याही प्रकारची नोटीस आली नाही. महाराष्ट्र पोलीस दिल्ली पोलिसांसारखे नाहीत, आम्हाला नेहमी सहकार्य असतं” “आमची पहिली मागणी आहे ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा, जर निवडणुका पारदर्शकपणे होणार नसतील, तर अशा लोकांचा काय फायदा आहे?. गोकुळमध्ये काय झालं ते आपण बघितलं. कशाप्रकारे हे दूध डेरीचे सुद्धा इलेक्शन सोडत नाहीत, यांनी लायकी काढली स्वतःची. दूध डेरीची निवडणूक हरली तर सरकारमधून चार सदस्य देतात, काही करून दूध डेरी त्यांच्या हातात आली पाहिजे. दूध डेरीच्या निवडणुकीत जरं असं करत असतील, तर विचार करा राज्यस्तरीय निवडणुकीत हे काय करत असतील” अशी टीका अभिजीत दीपके यांनी केली.
..तर मुख्यमंत्र्यांनी विचार करावा
गोकुळमध्ये शासन नियुक्त सदस्यांची बाजू कोर्टात मांडण्यासाठी 80 लाखाची फिस वकिलांना दिली. त्यावर सुद्धा अभिजीत दीपके यांनी टीका केली. “असं जर खरंच असेल, तर मुख्यमंत्र्यांनी विचार करावा, राज्यात दुष्काळ पडला आहे, शेतकऱ्यांना किती दिले आहेत?. गोकुळ मध्ये जे चार शासकीय सदस्य होते त्यांची पदं वाचवण्यासाठी तुम्ही वकिलांना 80-90 लाख रुपये देत आहात.महाराष्ट्रात दुष्काळ पडलाय, तुम्ही शेतकऱ्यांना किती पैसे दिलेत? काहीही करून स्वतः काबीज करायची सत्तेची भूक आहे भारतीय जनता पार्टीची. यांनी सगळ्या देशाचं वाटोळ केलं आहे” असं अभिजीत दीपके म्हणाले.
