…तर मंत्र्यांना स्पष्ट संदेश जाईल, अण्णा हजारेंचं पंतप्रधान मोदींना पत्र, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी

दिल्लीमध्ये कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू आहे, अण्णा हजारे यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. उद्या अण्णा आंदोलन देखील करणार आहेत, या सर्व पार्श्वभूमीर त्यांनी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे.

...तर मंत्र्यांना स्पष्ट संदेश जाईल, अण्णा हजारेंचं पंतप्रधान मोदींना पत्र, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी
Anna Hazare
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jul 22, 2026 | 7:52 PM

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिल्लीमध्ये सुरू असलेल्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला आपला पाठिंबा जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी मोठी घोषणा केली आहे.  विद्यार्थांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अण्णा हजारे उद्या मौन आंदोलन करणार आहेत.   साकाळी 11 ते 1 या वेळेत अहिल्यानगरच्या वाडिया पार्क येथील गांधी स्मारकामध्ये अण्णा हजारे हे आंदोलन करणार आहेत.  सरकारने विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांचे प्रश्न सोडवावेत अशी मागणी अण्णा हजारे यांनी केली आहे. ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र देखील लिहिलं आहे.

पत्रात अण्णा हजारे यांनी नेमकं काय म्हटलं?  

नवी दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी घडलेली हिंसाचाराची घटना मनाला वेदना देणारी आणि दुःखद आहे. लोकशाही व्यवस्थेत घडणाऱ्या अशा घटना कोणाच्याच हिताच्या नसतात. माझं असं ठाम मत आहे की, कोणत्याही परिस्थितीमध्ये हिंसाचार, सार्वजनिक संपत्तीचं नुकसान तसेच अनावश्यक बळाचा उपयोग होता कामा नये. आज देशातील लाखो तरुण पेपरफुटी प्रकरण, नोकरभरती प्रक्रियेमध्ये होणारा विलंब, बेरोजगारी, तसेच इतर अनेक समस्यांमुळे चिंतेनं ग्रासले आहेत. तरुणांमध्ये आज जो काही असंतोष निर्माण झाला आहे, त्याला केवळ कायदा आणि प्रशासन व्यवस्थेचं अपयश म्हणून न पहाता, त्यांच्या समस्या समजून घेणं गरजेचं आहे. 2024 मध्ये देखील नीट परीक्षेचे पेपर फुटल्याचं प्रकरण समोर आलं होतं, या वर्षी देखील पेपर फुटले आहेत, 22 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आहे. नीट परीक्षा पुन्हा घेण्यात आली, मात्र या परीक्षेच्या निकालामध्ये देखील घोळ असल्याच्या बातम्या येत आहेत.

सरकारी कार्यप्रणालीमध्ये जेव्हा काही गडबड होते, किंवा घोटाळा होतो, तेव्हा त्यासाठी या यंत्रणेतील छोट्या अधिकाऱ्यांना जबाबदार ठरवलं जातं, मात्र जेव्हा काही चांगल्या गोष्टी घडतात तेव्हा त्याची जबाबदारी सरकार घेते. ही पद्धत योग्य नाहीये. गेल्या 25 दिवसांपासून विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे, त्यांच्याकडून या खात्याशी संबंधित मंत्र्याचा राजीनामा मागितला जात आहे, मला वाटतं जर जबाबदारी निश्चित करून त्या मंत्र्यानं राजीनामा दिला तर एका मंत्र्याच्या राजीनाम्यामुळे संपूर्ण सरकार कोसळणार नाहीये. तर यातून इतर मंत्र्यांना देखील स्पष्ट संदेश जाईल की जर त्यांनी आपलं काम योग्य पद्धतीने केलं नाही तर त्यांचं देखील पद जाऊ शकतं, असं या पत्रामध्ये अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us