मोठी बातमी! ‘राज ठाकरेंचं वर्तन तालिबानी पद्धतीचं’, सदावर्तेंचा हल्लाबोल, पोलिसांत तक्रार

राज्यात हिंदी भाषेचा मुद्दा चांगलाच तापला आहे, मनसेकडून शासनाच्या या निर्णयाला विरोध होत आहे, तर दुसरीकडे आता या वादात गुणरत्न सदावर्ते यांनी देखील उडी घेतली आहे.

मोठी बातमी! राज ठाकरेंचं वर्तन तालिबानी पद्धतीचं, सदावर्तेंचा हल्लाबोल, पोलिसांत तक्रार
Gunaratna Sadavarte
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 18, 2025 | 6:24 PM

शालेय अभ्यासक्रमात हिंदी भाषेची सक्ती करण्यात आली आहे, यावरून राज्यात आता वातावरण चांगलंच तापलं आहे. शासनाच्या या निर्णयाविरोधात मनसेनं आक्रमक भूमिका घेतली आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी काल ट्विट करत आपली भूमिका जाहीर केली होती. त्यांनी शासनाच्या या धोरणाला विरोध केला आहे. त्यानंतर आज आता मनसे चांगलीच आक्रमक झाली आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांनी शासन निर्णयाचं दहन केलं आहे. तर दुसरीकडे या वादात आता ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांनी देखील उडी घेतली आहे. त्यांनी राज ठाकरे यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. राज ठाकरे यांच्याविरोधात एफआयआर दाखल व्हावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

नेमकं काय म्हणाले गुणरत्न सदावर्ते? 

शाळांना टार्गेट केलं जात आहे, हे अत्यंत विदारक आहे. विद्यार्थ्यांना एक भाषा अधिक शिकायला मिळत आहे. मात्र असं असताना देखील स्वातंत्र्यापूर्वी आणि नंतर देखील कोणी एवढं तालिबानी पद्धतीनं वागलं नसेल, त्या प्रकारचं वर्तन हे राज ठाकरे यांचं आहे. हे अत्यंत दुख:द आहे.  राज ठाकरेंना कायदा कळतो की नाही असा प्रश्र उपस्थित होत आहे. राज ठाकरे यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण न वाचता, त्यांनी स्वत:ची राजकीय पोळी भाजण्यासाठी चालवलेला हा एक घाट आहे.

राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी शासन निर्णयाचं दहन केलं आहे. ही कृती अत्यंत चुकीची आहे. बेकायदेशीर आहे, त्याचबरोबर, असंवैधानिक आहे, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणारी आहे. फेक्ले्स लावता येत नाही, असं न्यायालयाने सांगितलं असताना देखील त्यांच्या कार्यकर्त्यांनी फेक्ले्स लावले. त्यावर लिहीलं आम्ही हिंदू आहोत, हिंदी नाही. हे जातीय तेढ निर्माण करणारं कृत्य आहे. म्हणून राज ठाकरे यांच्याविरोधात एफआयआर दाखल झाला पाहिजे, अशी मागणी यावेळी  गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे. त्यामुळे आता वातावरण  आणखी तापण्याची शक्यात आहे. यावर मनसेकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाहीये.