Congress Crisis : उदयपूरमध्ये ना चिंतन झालं ना विश्लेषण, राहुल गांधींशी चार वर्षांपासून चर्चा नाही, पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट

| Updated on: Jun 02, 2022 | 9:42 PM

जेव्हा त्यांनी सोनिया गांधींना भेटण्यासाठी वेळ मागितली तेव्हा ती मिळाली. मात्र गेल्या चार वर्षांत राहुल गांधींसोबत एकही भेट झालेली नाही, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले आहेत.

Congress Crisis : उदयपूरमध्ये ना चिंतन झालं ना विश्लेषण, राहुल गांधींशी चार वर्षांपासून चर्चा नाही, पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट
उदयपूरमध्ये ना चिंतन झालं ना विश्लेषण, राहुल गांधींशी चार वर्षांपासून चर्चा नाही, पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट
Image Credit source: tv9
Follow us on

मुंबई : राजस्थानमधील उदयपूर येथे झालेल्या काँग्रेसच्या (Congress) चिंतनशिबिरानंतरही नेत्यांची नाराजी अजूनही थांबायचं नाव घेत नाही. आता काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी एक मोठा गौप्यस्फोट केलाय. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी चार वर्षांपासून राहुल गांधींची (Rahul Gandhi) भेट नाही झाली म्हणत नाराजी दर्शवली आहे. ते म्हणाले की उदयपूरमध्ये चिंतन किंवा आत्मपरीक्षण असे काही झाले नाही. त्यामुळे काँग्रेसच्या गोटात पुन्हा एकदा खळबळ माजली आहे. मनमोहन सिंग सरकारमध्ये मंत्री असलेले पृथ्वीराज चव्हाण म्हणाले दिल्लीला गेल्यावर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना भेटतो, पण आता त्यांची प्रकृतीही ठीक नाही. मात्र जेव्हा त्यांनी सोनिया गांधींना भेटण्यासाठी वेळ मागितली तेव्हा ती मिळाली. मात्र गेल्या चार वर्षांत राहुल गांधींसोबत एकही भेट झालेली नाही, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले आहेत.

ऐन वेळी कार्यक्रमात बदल केला

चिंतन शिबिरात पक्षाच्या विविध मुद्द्यांवर चर्चा केली जाईल असे काँग्रेस अध्यक्षांनी ठरवले होते, पण चिंतन किंवा आत्मपरीक्षण करण्याची गरज नसल्याचे कुणीतरी ठरवले, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. आणि नंतर उदयपूर सभेला नव संकल्प शिबिर असे नाव देण्यात आले. आसाम आणि केरळमधील पराभवाचा आढावा घेण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीचा अहवालालाही कचरापेटी दाखवल्याचे यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. तसेच भाजपच्या हिंदुत्वापुढे काँग्रेसची मवाळ हिंदुत्वाची रणनीती फोल ठरली असून त्यामुळे काँग्रेसला उत्तर प्रदेशात मुस्लिम मते मिळालेली नाहीत, असे चव्हाण म्हणाले. त्यामुळे धर्मनिरपेक्षता स्पष्टपणे सांगावी लागेल. पृथ्वीराज चव्हाण हे देखील जी-23 मध्ये आहेत, जे सध्या पक्षाच्या हायकमांडवर खुश नाहीत.

काय आहे जी 23?

जी-23 ही काँग्रेसमधीलच काही नेत्यांची संघटना आहे, जी सध्या काँग्रेसच्या नेतृत्वावर आणि वाटचालीवर समाधानी नाही. यांची नाराजी आधीही उघड झाली आहे. 2014 ला केंद्रात मोदी सरकार आल्यापासून काँग्रेसमध्ये सतत पडझड सुरू आहे. ती अजूनही थांबयचं नाव घेत नाही. काँग्रेसमधील नेत्यांची बंडखोरीही अनेकदा बाहेर आली आहे. काही दिवसांपूर्वीच काँग्रेसच्या काही ज्येष्ट नेत्यांनी या संघटनेद्वारे आपली नाराजी काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाला उघडपणे पत्र लिहीत कळवली होती. पृथ्वीराज चव्हाण यांना अतिशय स्पष्ट बोलणारे आणि स्वच्छ चरित्राचे नेते म्हणून पाहिलं जातं. गेली अनेक वर्षे त्यांनी काँग्रेस पक्षात विविध जबाबदाऱ्या पार पाडत अनेक पदं भुषवली आहेत. त्यामुळे त्यांनीच आता अशी नाराजी व्यक्त केल्याने हा चिंतेचा विषय बनला आहे.

हे सुद्धा वाचा