K C Padavi : पापी माणसं पापीच असतात, माजी मंत्री के.सी.पाडवींनी आमदार डॉ. विजयकुमार गावित यांच्याबद्दल अत्यंत जिव्हारी लागतील असे शब्द वापरले
K C Padavi : काँग्रेस नेते के. सी. पाडवी यांनी आमदार डॉ. विजयकुमार गावित यांच्यावर अत्यंत बोचऱ्या आणि जिव्हारी लागतील अशा शब्दात टीका केली आहे. त्यांनी डॉ. विजयकुमार गावित यांचा इतिहासच सांगितला. जिल्ह्याच्या राजकारणातील हे दोन्ही बडे नेते आहेत.

माजी आमदार आणि माजी मंत्री के. सी. पाडवी यांनी आमदार डॉ. विजयकुमार गावित आणि माजी खासदार डॉ. हिना गावित यांच्यावर टीका केली आहे. “डॉ. विजयकुमार गावित यांना आणि त्यांच्या वडिलांनाही मीच निवडणुकीचे तिकीट दिले. त्यांना मंत्रीही मीच केले. मात्र पापी माणसं पापीच असतात” असं केसी पाडवी टीका करताना म्हणाले. “मी मंत्री असताना हिना गावित यांना पैसे आणि रस्ते विकासासाठी निधी दिला. मात्र मी मंत्रीपदावरून गेल्यानंतर 771 कामे रद्द केली. मी मंजूर केलेली कामे होती, मात्र डॉ. गावित यांनी ती आपणच केल्याचे दाखवले” असा केसी पाडवी यांनी आरोप केला. “डॉ. विजयकुमार गावित आणि त्यांच्या वडिलांनाही मीच निवडणुकीचे तिकीट दिले होते, तर डॉ. गावित यांना मंत्रीही मीच केले होते” असा केसी पाडवी यांनी दावा केला.
डॉ. विजयकुमार गावित यांना पापी माणूस म्हणत के.सी.पाडवी यांनी जहरी टीका केली. के.सी.पाडवी यांच्या टीकेमुळे गावित आणि पाडवी यांच्यातील राजकीय वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे. केसी पाडवी आणि डॉ. विजयकुमार गावित हे दोघेही नंदूरबार जिल्ह्यातून येतात. के.सी. पाडवी हे राज्याचे आदिवासी मंत्री होते. एक वेळा अपक्ष आणि सातवेळा काँग्रेसच्या तिकीटावर ते निवडून आले. त्या तुलनेत त्यांना कॅबिनेट मंत्रीपद उशिरानेच मिळालं. साधी राहणीमान आणि प्रचंड लोकसंपर्क ही के.सी. पाडवी यांच्या राजकारणाची ओळख आहे.
कोण आहेत के.सी.पाडवी?
के.सी. पाडवी यांनी नंदूरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा मतदारसंघाचं विधानसभेत प्रतिनिधीत्व केलं. अॅड. के. सी. पाडवी यांचा जन्म 3 मार्च 1957 रोजी नंदूरबार जिल्ह्यातील अक्रणी महाल तालुक्यातील असली गावी झाला. त्यांचं शिक्षण बीए, एलएलएमपर्यंत झालं आहे. मराठी, हिंदी, इंग्रजीसह आदिवासी भाषा त्यांना अवगत आहेत. पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा त्यांचा परिवार आहे. शेती आणि वकिली हा त्यांचा प्रमुख व्यवसाय आहे. नंदूरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा हा त्यांचा मतदारसंघ आहे. पाडवी आणि गाविते हे दोघेही नंदूरबार जिल्ह्यातील मोठे नेते आहेत.
