Nana Patole : सुधीर तांबे यांनी सत्यजित तांबे यांना पाठिंबा दिल्यानंतर नाना पटोले भाजपवर प्रचंड संतापले, म्हणाले….

| Updated on: Jan 12, 2023 | 7:12 PM

"भाजपने भय दाखवून दुसऱ्यांची घरं फोडणं हा नवीन व्यवसाय सुरु केलेला आहे", अशी टीका नाना पटोले (Nana Patole) यांनी केली.

Nana Patole : सुधीर तांबे यांनी सत्यजित तांबे यांना पाठिंबा दिल्यानंतर नाना पटोले भाजपवर प्रचंड संतापले, म्हणाले....
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले
Image Credit source: social media
Follow us on

स्वप्निल उमप, Tv9 मराठी, मुंबई : काँग्रेस नेते सुधीर तांबे (Sudhir Tambe) यांनी नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा (Nashik Padvidhar Election) उमेदवारी अर्ज न भरता आपले चिरंजिव सत्यजित तांबे यांना पाठिंबा दिल्याने खळबळ उडाली आहे. सत्यजित तांबे यांनी नाशिक पदवीधर निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय. तसेच त्यांनी भाजपने आपल्याला पाठिंबा द्यावा यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचं विधान केलंय. तर दुसरीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बानकुळे यांनी सूचक विधान केलंय. सत्यजित तांबे यांनी पाठिंबा देण्यासाठी विनंती केली तर विचार करु, असं विधान केलंय. या सगळ्या घडामोडींवर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी प्रतिक्रिया दिलीय. यावेळी नाना पटोले यांनी भाजपवर संताप व्यक्त केलाय.

“भाजपने भय दाखवून दुसऱ्यांची घरं फोडणं, दुसऱ्यांची लोकं आपल्या ताब्यात घेणं हा नवीन व्यवसाय या लोकशाहीच्या व्यवस्थेत सुरु केलेला आहे. आणि ते लपलेलं नाही”, असं नाना पटोले म्हणाले.

‘भाजप लोकशाहीचा चुराळा करायला निघालीय’

“सत्यजित तांबे यांची आज काय प्रतिक्रिया द्यावी, त्यांची काय भूमिका असेल त्याबद्दल मला काही म्हणायचं नाही. पण भाजप लोकशाहीचा चुराळा करायला निघालेली आहे. त्यांना आज या सगळ्या गोष्टी सोप्या वाटत आहेत. पण पुढे त्यांचं जेव्हा घर फुटेल तेव्हा त्यांना दु:ख कळेल”, अशा शब्दांत नाना पटोले यांनी संताप व्यक्त केला.

हे सुद्धा वाचा

“मी आज फार प्रतिक्रिया देणार नाही. सत्यजित तांबे यांनी अपक्ष अर्ज भरलाय. अपक्ष उमेदवाराने काय निर्णय घ्यावा तो त्यांचा प्रश्न आहे. मी सगळी माहिती घेऊन भूमिका मांडेन”, अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली.

‘आमचे उमेदवार सुधीर तांबे होते’

“आमचे उमेदवार सुधीर तांबे होते हे एकदम स्पष्ट होते. सुधीर तांबे यांना मी तिकीट दिलं होतं. त्यांनी का फॉर्म भरला नाही. त्याची कारणं काय? आमचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे देखील त्यांच्यासोबत होते. याबाबत सगळी माहिती घेऊनच त्यावर प्रतिक्रिया देऊ”, असंही ते यावेळी म्हणाले.

“भारतीय जनता पक्षाचे लोकं काहीही बोलू शकतात. त्यामुळे मी तुम्हाला सांगतोय की, सगळी माहिती घेऊन वेळेवर प्रतिक्रिया देऊ”, अशी टीका त्यांनी केली.

“राजकीय समीकरणात पुढे काय-काय होतात ते आपण बघू ना. पण ही जी घटना झालीय ती चांगली झालीय असं मी समजत नाही. म्हणून यावर सगळी माहिती घेऊनच प्रतिक्रिया देऊ”, अशी पहिली प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली होती.