
सध्या महाविकासआघाडीत मनसेला घेण्याच्या मुद्द्यावरुन वातावरण तापलं आहे. त्यातच आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मनसेला महाविकास आघाडीमध्ये घेण्याच्या मुद्द्यावरून काँग्रेस हायकमांडला एक पत्र लिहिले आहे. यात त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची तक्रार केली आहे. मनसेला महाविकासआघाडीत घेण्याला हर्षवर्धन सपकाळ यांचा तीव्र विरोध आहे. याबद्दल संजय राऊत यांनी थेट दिल्ली दरबारी तक्रार केल्याचे बोलले जात आहे. आता या संपूर्ण प्रकरणावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टीव्ही ९ मराठीशी संवाद साधला. यावेळी त्यांना संजय राऊतांनी केलेल्या तक्रारीबद्दल विचारणा करण्यात आली. त्यावर त्यांनी थेट भाष्य केले. सध्या तरी मनसेला आघाडीच्या अनुषंगाने घेण्यासंदर्भातील कोणतीही चर्चा सुरु नाही. यामुळे याबद्दल काहीही चर्चा सुरु नसताना कोणतीही तक्रार करण्याचा प्रश्नच येत नाही. त्यांनी तक्रार करण्यासारखं काही घडलेलं नाही,” असे सपकाळ म्हणाले. ही केवळ उठवलेली आरोळी असून, कोणतीही तक्रार झाली, याबद्दल मला माहिती नाही. तसे ती तक्रार होण्याचे काही कारणही नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
संजय राऊत यांनी राज्यातील नेत्यांकडे दुर्लक्ष करत थेट दिल्लीतील काँग्रेस श्रेष्ठींना पत्र लिहून सपकाळ यांच्याबद्दल तक्रार केली. सपकाळ यांनी मनसेला आघाडीत घेण्यास तीव्र विरोध दर्शवला होता. हर्षवर्धन सपकाळ यांनी राऊत यांना राज ठाकरे यांच्याबाबत चर्चा करून कळवतो असे सांगितले होते. तरीही संजय राऊत यांनी थेट श्रेष्ठींकडे तक्रार केल्यामुळे काँग्रेस श्रेष्ठींनी नाराजी व्यक्त केली आहे. प्रदेशाध्यक्षांना विश्वासात न घेता थेट हायकमांडकडे तक्रार करणे, ही कृती योग्य नसल्याचे काँग्रेस श्रेष्ठींचे मत आहे.
तर दुसरीकडे राज ठाकरेंच्या मनसेला आघाडीत घेण्याला काँग्रेसचा आधीपासूनच विरोध आहे. हा विरोध आजही कायम असल्याचे पक्षाच्या श्रेष्ठींनी स्पष्ट केले आहे. मनसेला महाविकास आघाडीत घेतल्यास उत्तर भारतीय आणि मुस्लिम मतदार दुरावतील, अशी काँग्रेसची स्पष्ट भूमिका आहे. हे मतदार काँग्रेसचे पारंपरिक आधारस्तंभ मानले जात असल्याने, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांमध्ये हे मतदार दुरावणे पक्षाला परवडणारे नाही. त्यामुळे मनसेच्या समावेशावर अद्याप कोणतीही चर्चा झाली नसल्याचेही श्रेष्ठींनी स्पष्ट केले आहे.
मनसेच्या संभाव्य समावेशावरुन महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस या दोन प्रमुख पक्षांमध्ये मोठे मतभेद होत असल्याचे समोर येत आहे. तसेच यावरुन आघाडीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.