मोठी बातमी! बारामतीच्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसचा उमेदवार ठरला; कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब?
मोठी बातमी समोर येत आहे, अखेर काँग्रेसकडून बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी आपला उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी उमेदवाराची घोषणा केली.

मोठी बातमी समोर येत आहे, अखेर काँग्रेसकडून बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी आपला उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी या पोटनिवडणुकीसाठी आकाश मोरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे. याबाबत रविवारी काँग्रेसकडून अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती विधानसभेची जागा रिक्त झाली होती. या विधानसभेच्या जागेवर आता पोटनिवडणूक होणार आहे. या निवडणुकीमध्ये महायुतीकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे आता या निवडणुकीत सुनेत्रा पवार यांना आकाश मोरे यांचं आव्हान असणार आहे.
ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी महायुतीकडून प्रयत्न सुरू होता, मात्र काँग्रेसने ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे आता ही निवडणूक महायुतीविरोधात काँग्रेस अशी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला असून, काँग्रेसने आपला उमेदवार जाहीर केला आहे. काँग्रेसकडून आकाश मोरे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलं आहे. आज याबाबत पक्षाकडून घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान उद्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे बारामतीच्या दौऱ्यावर आहेत, त्यामुळे उद्याच आकाश मोरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला जाऊ शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
दरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटानं या निवडणुकीसाठी सुनेत्रा पवार यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे. सुनेत्रा पवार या महायुतीच्या उमेदवार आहेत, तर राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गट हे महाविकास आघाडीचे घटक पक्ष आहेत. तर या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी आणि इतर काही पक्षांनी काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आता ही निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता आहे.
या निवडणुकी संदर्भात बोलताना राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी म्हटलं आहे की, ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी आमची भूमिका आहे. त्यामुळे गरज पडली तर आम्ही काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची देखील भेट घेऊ.