शेतकऱ्यांनी दिवाळीच्या दिवशी एक तास…; सरकारला धडा शिकवण्यासाठी काँग्रेसचा सर्वात मोठा प्लॅन

काँग्रेसने राज्यातील शेतकरीविरोधी धोरणांवरून 'काळी दिवाळी' साजरी करण्याचे आवाहन केले आहे. विजय वडेट्टीवार यांनी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत न मिळाल्याने आणि पिकाला योग्य भाव नसल्याने सरकारवर टीका केली.

शेतकऱ्यांनी दिवाळीच्या दिवशी एक तास...; सरकारला धडा शिकवण्यासाठी काँग्रेसचा सर्वात मोठा प्लॅन
Updated on: Oct 17, 2025 | 1:00 PM

राज्यात सध्या दिवाळीचा उत्साह पाहायला मिळत आहे. त्यातच आता काँग्रेसने सरकारचा निषेध करण्यासाठी काळी दिवाळी साजरी करा, असे आवाहन केले आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्यातील शेतकरीविरोधी धोरणांवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार सरकारवर जोरदार हल्ला चढवला. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारने केलेली मदत केवळ बनवाबनवी आहे. या फसवणुकीमुळे शेतकऱ्यांवर यंदाची दिवाळी काळी दिवाळी म्हणून साजरी करण्याची वेळ आली आहे, असे विजय वडेट्टीवार म्हणाले.

या सरकारचा निषेध म्हणून दिवाळीच्या दिवशी एक तास महाराष्ट्रात सर्व शेतकऱ्यांनी काळी दिवाळी साजरी करुया. यावेळी सर्वांनी दिवे बंद करून या सरकारचा निषेध करावा. शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेण्यासाठी मी सर्वांना आवाहन करतो आहे, असे आवाहन विजय वडेट्टीवार यांनी केले.

यावेळी विजय वडेट्टीवार यांनी सरकारचे दोन जीआर लोकांसमोर मांडले. सरकारने काढलेल्या ९ तारखेच्या जीआरमध्ये अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी जमीन महसुलात सूट, कर्जाचे पुनर्गठन, कर्जवसुली स्थगिती आणि परीक्षा शुल्कात माफी अशा सवलतींचा उल्लेख होता. मात्र १० तारखेला काढलेल्या दुसऱ्या जीआरमध्ये या सवलतींचा उल्लेखच वगळण्यात आला. त्यामुळे लोकांपुढे एक वेगळं मांडायचं आणि शेतकऱ्यांची फसवणूक करायची. दुसरीकडे वस्तूस्थिती वेगळी असायची, हे या सरकारचं धोरण आहे,” असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

सोयाबीनला योग्य भाव नाही, कापसाची कमी दरात खरेदी 

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी केंद्राकडे एनडीआरएफच्या मदतीचा प्रस्ताव अद्यापही पाठवण्यात आलेला नाही. तसेच, कापूस खरेदी केंद्रांना अजून सरकारने परवानगी दिली नाही. ओलावा कमी करण्याच्या नियमांमुळे महाराष्ट्रातील कापूस व्यापारी कमी दरात खरेदी करतील. परिणामी, शेतकऱ्याला ४-४.५ हजार रुपयांत कापूस विकावा लागेल आणि तो उद्ध्वस्त होईल. सोयाबीनलाही योग्य भाव मिळत नाहीये, असेही वडेट्टीवार म्हणाले.

शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत देऊ असं सांगण्यात आलं होतं. पण शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे वळते झालेले दिसत नाहीत. थोडी तरी जनाची नाही तर मनाची लाज वाटत असेल तर शेतकऱ्यांचा छळ करू नये, असा खोचक टोला वडेट्टीवारांनी लगावला.

शिवाजीराव कर्डिले जनतेच्या प्रश्नांसाठी लढणारे नेते

दरम्यान काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी नुकतेच निधन झालेले ज्येष्ठ नेते शिवाजीराव कर्डिले यांना श्रद्धांजली अर्पण केली. शिवाजीराव कर्डिले यांच्यासोबत आम्ही अनेक वर्षे सभागृहात काम केले आहे. ते नेहमी जनतेच्या प्रश्नांना घेऊन आंदोलन करणारे आणि त्यासाठी लढणारे नेते म्हणून ओळखले जात होते. मी त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, असे वडेट्टीवार यांनी सांगितले.