
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना जीवे मारण्याचा कट रचण्यात आल्याचा आरोप बीडच्या एका कार्यकर्त्याकडून करण्यात आला आहे, त्याने यासंदर्भात जालना पोलीस ठाण्यात तक्रार देखील दिली आहे. बीडमधूनच हा कट रचला गेल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे, या प्रकरणात पोलिसांनी दोन संशयित व्यक्तींना ताब्यात घेतलं असून, त्यांची कसून चौकशी सुरू आहे. ही तक्रार जालना पोलिसांना प्राप्त होताच खळबळ उडाली आहे. दरम्यान यावर आता मनोज जरांगे पाटील यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे, मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या दाव्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे.
नेमकं काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?
हे सत्य आहे, कट शिजला गेला आहे, हत्या घडवून आणण्याचा किंवा घातपात करण्याचा कट आहे, हे आता उघड होईलच. जालना जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांनी स्वत: या प्रकरणामध्ये लक्ष घातले आहे. त्यामुळे लवकरच या प्रकरणात दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल. हा कट खूप मोठ्या व्यक्तीनं रचला आहे, असा गौप्यस्फोट यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी केल आहे, जरांगे पाटील यांच्या या गौप्यस्फोटामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. या सर्व बाबी तपासातून स्पष्ट होतीलच. मी उद्या आकरा वाजता यावर पत्रकारांशी सविस्तर बोलणार आहे, सध्या मी ते सर्व पुरावे पहात आहे, असंही यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी त्यांच्याविरोधात ज्यांनी कट रचण्याचा प्रयत्न केला, त्यांना देखील इशारा दिला आहे. बाळ तुला सांगतो तू खूप चुकीच्या ठिकाणी हात घातलास, असे आम्ही खूप बघितले आहेत. तू खूप चुकीचं पाऊल उचललं, ज्यांनी कट रचला त्यांना मी इशारा देत आहे. आम्ही मराठे आहोत एवढं लक्षात ठेवं, मी खंबीर आहे, मराठा बांधवांना मी विनंती करतो की तुम्ही शातं राहा, असंही यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. दरम्यान जरांगे पाटील यांनी केलेल्या या दाव्यामुळे आता चर्चेला उधाण आलं आहे.