देशभरात पुन्हा कोरोनाचे थैमान, 24 तासांत 7 मृत्यू, महाराष्ट्राची स्थिती काय?
भारतात कोरोनाची संख्या पुन्हा वाढत आहे. देशभरात सक्रिय रुग्णांची संख्या वाढली असून, काही मृत्यूंचीही नोंद झाली आहे. दिल्ली, कर्नाटक आणि महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत.

देशभरात पुन्हा एकदा कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. सध्या कोरोनाच्या सक्रीय रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. बुधवारी देशभरात ४ हजार ३०२ सक्रिय रुग्ण होते. आता आज ही संख्या वाढून ४ हजार ८६६ वर पोहोचली आहे. तसेच गेल्या २४ तासात ७ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असली तरी दिलासादायक बाब म्हणजे अनेक रुग्ण या आजारातून बरे होत आहे. सध्या देशभरात बरे होऊन घरी परतलेल्या रुग्णांची संख्या ३,९५५ झाली आहे.
राजधानी दिल्लीत गेल्या २४ तासांत कोरोनाचे १०५ नवीन रुग्ण आढळले आहेत. ज्यामुळे सक्रिय रुग्णांची एकूण संख्या ५६२ इतकी झाली आहे. कोरोनामुळे दिल्लीत दोन मृत्यूंची नोंद झाली आहे. यात एका ५ महिन्यांच्या बाळाचा समावेश आहे. तर एका ८७ वर्षीय वृद्धाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. संपूर्ण देशभरात २४ तासांत कोरोनामुळे ७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये दिल्लीतील २, कर्नाटकातील २ आणि महाराष्ट्रातील ३ रुग्णांचा समावेश आहे.
महाराष्ट्रात तीन मृत्यू
कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढता प्रादुर्भाव देशभरात दिसून येत आहे. कर्नाटकात २ कोरोना मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. यात एक ६५ वर्षीय आणि एका ४२ वर्षीय अशा दोन पुरुषांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रातही कोरोनामुळे तीन मृत्यूंची नोंद झाली आहे. यात २ पुरुष आणि एका वृद्ध महिलेचा समावेश आहे.
कोणत्या राज्यात किती रुग्ण?
| राज्य | रुग्णसंख्या |
| आंध्र प्रदेश | 50 |
| आसाम | 8 |
| बिहार | 31 |
| चंदीगड | 2 |
| छत्तीसगड | 19 |
| दिल्ली | 562 |
| गोवा | 8 |
| गुजरात | 508 |
| हरियाणा | 63 |
| हिमाचल प्रदेश | 1 |
| जम्मू-कश्मीर | 5 |
| झारखंड | 8 |
| कर्नाटक | 436 |
| केरळ | 1487 |
| उत्तर प्रदेश | 198 |
| पश्चिम बंगाल | 538 |
नागरिकांना खबरदारीचे आवाहन
देशात कोरोनाच्या पुनरागमनानंतर, प्रशासनाकडून नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. पुन्हा एकदा सर्वांना मास्क लावणे आणि सुरक्षित सामाजिक अंतर राखण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. तसेच, कोविडमुळे देशात निर्माण झालेल्या पूर्वीच्या परिस्थिती लक्षात घेता रुग्णालयांमध्ये तयारीला वेग देण्यात आला आहे. आवश्यक वैद्यकीय साधनांचा आणि वस्तूंचा पुरवठा सुनिश्चित केला जात आहे.
