
राज्यातील प्रसिद्ध किर्तनकार आणि समाजप्रभोधनकार निवृत्ती महाराज देशमुख उर्फ इंदुरीकर महाराज हे आपल्या आगळ्या वेगळ्या किर्तन शैलीमुळे चर्चेत असतात. किर्तनांच्या माध्यमातून इंदुरीकर महाराज समाजात जनजागृतीचं काम करतात. शेतकऱ्यांची स्थिती, लग्न, घरात होणारी सासू-सुनेचे भांडणं या प्रश्नांवर ते आपले परखड मत मांडत असतात. अलिकडेच इंदुरीकर महाराज यांच्या मुलीचा साखरपुडा पार पडला. यावरून डब्बेवाला संघटनेने इंदुरीकर महाराजांवर जोरदार टीका केली आहे. याबाबत माहिती जाणून घेऊयात.
सध्याच्या काळात मोठ्या धामधुमीत लग्न केले जाते. यावर बोलताना इंदुरीकर महाराजांनी अनेकदा भाष्य करताना ज्यांच्याकडे पैसे नाहीत त्यांनी लोकांना दाखवण्यासाठी कर्ज काढून आपल्या मुला-मुलींचे लग्न मोठ्या थाटात करू नका, लग्न साध्या पद्धतीनं करा, साध्या पद्धतीने लग्न केले तरी मुलं होतात असं विधान केलेले आहे. मात्र आता या विधानावरून मुंबई डबेवाला संघटनेचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी जोरदार टीका केली आहे. दुसऱ्यांना अक्कल शिकवणाऱ्या इंदुरीकर महाराजांनी पोरीच्या साखरपुड्याला लाखोंचा खर्च केला असा आरोप तळेकर यांनी केला आहे.
मुंबई डबेवाला संघटनेचे अध्यक्ष सुभाष तळेकर इंदुरीकर महाराजांवर टीका कराताना म्हटले की, ‘बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले, या उक्तीप्रमाणे जर निवृत्ती महाराज इंदुरीकर वागले असते, तर त्यांनी मुलीचा अतिशय साध्या पद्धतीने साखरपुडा करून समाजापुढे आदर्श निर्माण केला असता. समाजाला कीर्तनातून उपदेश करताना आपण एक बोलता परंतु त्याचा जीवनात अवलंब करत नाही, याचा खेद वारकरी सांप्रदायाला आहे. निवृत्ती महाराज त्यांच्या उपदेशाप्रमाणे वागले असते तर सांप्रदायाला नक्कीच अभिमान वाटला असता.’
इंदुरीकर महाराज यांची मुलगी ज्ञानेश्वरी देशमुख आणि साहिल चिलाप यांचा नुकताच साखरपुडा झाला आहे. साहिल चिलाप हे बांधकाम व्यावसायिक असल्याची माहिती समोर येत आहे, त्यांचा मुंबईमध्ये मोठा व्यावसाय आहे. समोर आलेल्या माहितीनुसार साहिल चिलाप हे पुणे जिल्ह्यातल्या जुन्नरमधील मुळचे रहिवासी आहेत, ते उच्च शिक्षित असून, गावाकडे त्यांची मोठी बागायती शेती आहे.