
दादर पश्चिमेकडील प्रसिद्ध कबूतरखान्याच्या मुद्यावरून सुरू असलेला वाद आता तापत चालल्याचे दिसत आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर तो कबूतर खाना बंद करण्यात आला असून त्यानंतर तिथे लावण्याच आलेल्या ताडपत्रींवर अजूनही मोठ्या प्रमाणात कबूतर येऊन बसत आहेत. मात्र आता तीच कबूतरं हटवण्यासाठी आता कर्मचाऱ्यांना कामाला लावण्यात आलं आहे. त्यामुळे आज सकाळपासून ते कर्मचारी हातात काठ्या आणि फडकी घेऊन कबूतर पळवण्याचा काम करत आहेत. तसेच कबूतरांना खाद्य दिल्यास कारवाईचा इशारा मनपाने दिला असून तसे बॅनरही त्या कबूतर खान्याजवळ लावण्यात आला आहे.
दरम्यान कबूतरांच्या खाण्यापिण्याची अन्य ठिकाणी सोय करावी, अशी मागणी मंगल प्रभात लोढा यांनी केली आहे. वाद्रे कुला संकुल, रेसकोर्स, आरे कॉलनी, किंवा संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आदी मोकळ्या जागांचा कबूतरांना खाद्य देण्यासाठी तात्पुरता वापर करावा, अशी लेखी मागणी मंगलप्रभात लोढा यांनी महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
कबुतरांचा वावर परिसरात असल्याने आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो, श्वसनाचे तसेच अनेक त्रास होऊ शकतात. त्यामुळेच मुंबईतील कबूतरखाने बंद करण्याची मागणी अनेक वर्षांपासून नागरिकांकडून केली जात होती. त्यानुसार राज्य सरकारने कबूतरांमुळे निर्माण होणाऱ्या समस्या लक्षात घेऊन पावसाळी अधिवेशनात कबूतरखाने बंद करण्यासाठी तात्काळ मागणी करावी, असे आदेश महापालिका प्रशासनाला दिले. त्यानंतर दादर येथील कबूतरखाना बंद करण्यात आला. तेथे ताडपत्रीही टाकण्यात आली. त्यामुळे तेथे कबूतर त्यावर आणि रस्त्यावर येऊन बसत असल्याचे चित्र दिसत आहे.
मात्र महापालिकेने मुंबईतील कबूतरखाने आणि कबूतरांना खाद्य टाकणाऱ्यांविरोधात कारवाई तीव्र केल्यानंतर आत्ता प्राणीप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे , तसेच जैन समाजही आक्रमक झाला आहे. या पक्ष्यांना आपल्याशिवाय कोण असा सवाल विचारला जात आहे. आता याचे काय पडसाद ऊमटणार हे पाहणं महत्वाचे ठरेल.