एकनाथ शिंदेंचे विमान उडवण्यास पायलटचा नकार, कारण…

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जळगावहून मुंबईच्या प्रवासाला अचानक अडथळा आला आहे. त्यांच्या विमानाचे पायलट १२ तासांहून अधिक काळ विमान चालवल्याने थकले असल्याने त्यांची प्रकृती बिघडली. त्यामुळे त्यांनी विमान उडवण्यास नकार दिला.

एकनाथ शिंदेंचे विमान उडवण्यास पायलटचा नकार, कारण...
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 06, 2025 | 10:44 PM

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जळगावहून मुंबईकडे येत असताना अचानक मोठा गोंधळ झाला आहे. त्यामुळे त्यांना मुंबईकडे परतण्यास उशीर होण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांच्या विमानातील पायलटने विमान उडवण्यास नकार दिल्याने हा उशीर झाल्याचे बोललं जात आहे. एकनाथ शिंदेंच्या पायलटची तब्ब्येत अचानक बिघडली आहे. त्यामुळे पायलटने विमान उडवण्यास नकार दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

नेमकं काय घडलं? 

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. रात्री उशिरा मुक्ताईनगर येथील आपला दौरा आटोपून एकनाथ शिंदे जळगाव विमानतळावर दाखल झाले. त्यांना तातडीने मुंबईला रवाना व्हायचे होते. त्यांची विमान उडवण्याची वेळ ठरली होती. पण त्यावेळी त्यांच्या विमानातील पायलटने विमान उडवण्यास नकार दिला.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदेंच्या विमानाचा पायलट १२ तासांहून अधिक काळ सलग विमान चालवत असल्याने थकला होता. त्यामुळे त्याची तब्येत बिघडली होती. प्रकृतीच्या कारणामुळे विमान उडवण्यास असमर्थ असल्याचे पायलटने सांगितलं. यामुळे एकनाथ शिंदे स्वत: पायलटची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र पायलटने विमान उडवण्यास स्पष्ट नकार दिल्याचे बोललं जात आहे.

वेटींग रुममध्ये बंद दाराआड चर्चा

यामुळे एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतचा ताफा विमानतळावरच थांबला आहे. परिस्थितीची गांभीर्य लक्षात घेऊन मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी तात्काळ पायलटची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. या दोन्ही मंत्र्यांनी समजूत काढल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी स्वतः तिन्ही पायलटसोबत चर्चा केली. विमानतळावरील वेटींग रुममध्ये बंद दाराआड ही चर्चा सुरू होती. तसेच पायलटांच्या प्रकृतीची तपासणी करण्यासाठी डॉक्टरांनाही विमानतळावर बोलवण्यात आले.

त्यामुळे आता पायलट काय निर्णय घेणार, एकनाथ शिंदे जळगावात मुक्काम करणार का, असे प्रश्न उपस्थित केले जात आहे. मात्र पायलटच्या नकारामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुंबईला जाण्यास मोठा विलंब झाल्याचे पाहायला मिळत आहे.