विलेपार्लेत दहीहंडीत जखमी झालेल्या गोविंदाचा मृत्यू; सरकारी मदती वरुन राजकारण सुरु

वनिता कांबळे

Updated on: Aug 22, 2022 | 10:37 PM

संदेश दळवी असे मृत गोविंदाचे नाव आहे. संदेश अवघ्या 23 वर्षांचा होता. विलेपार्ले येथील शिव संभू मंडळाचे तो सदस्य होता. मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबियांवर दुख:चा डोंगर कोसळला आहे. दळवी कुटुंब आता सरकारी मदतीच्या प्रतिक्षेत आहे.

विलेपार्लेत दहीहंडीत जखमी झालेल्या गोविंदाचा मृत्यू; सरकारी मदती वरुन राजकारण सुरु
Image Credit source: Social Media

मुंबई : दोन वर्षानंतर प्रथमच दहीहंडी (Dahihandi 2022) निर्बंधमुक्त साजरा करण्यात आला. दहीहंडी उत्सवादरम्यान ही दहीहंडी फोडताना थरांवरून कोसळून शंभर पेक्षा अधिक गोविंदा जखमी (Govinda injured)झाले. विलेपार्लेत दहीहंडीत जखमी झालेल्या गोविंदाचा रुग्णालयात उपचार सुरु असताना मृत्यू झाला आहे. संदेश दळवी असे मृत गोविंदाचे नाव आहे. संदेश अवघ्या 23 वर्षांचा होता. विलेपार्ले येथील शिव संभू मंडळाचे तो सदस्य होता. मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबियांवर दुख:चा डोंगर कोसळला आहे. दळवी कुटुंब आता सरकारी मदतीच्या प्रतिक्षेत आहे.

दोन वर्षानंतर प्रथमच कोणत्याही निर्बंधाशिवाय दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. मुंबईत अनेक ठिकाणी मोठ्या दहीहंडी उत्सवांचे आयोजन करण्यात आले होते. आयोजकांतर्फे लाखोंची बक्षिसे ठेवण्यात आली होती. यामुळे गोविंदा पथकांमध्ये बक्षिस मिळवण्यासाठी चढाओढ लागली होती. मुंबईत ठिकठिकाणी दहीहंडी फोडण्यासाठी लाखोंचे बक्षीस ठेवण्यात आले आहे. त्यामुळे बक्षीस मिळवण्यासाठी थरावर थर रचले गेले. अशाच एका थरावरुन पडून संदेश गंभीर जखमी झाला होता. त्याला सर्व प्रथम अंधेरी येथील कूपर हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, त्याची प्रकृती आणखी बिघडल्याने त्याला नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

नानावटी हॉस्पीटलमध्ये ताबडतोब त्याचे ऑपरेशन करण्यात आले. त्याच्या डोक्यामध्ये रक्ताची गाठ जमा झाली होती. ऑपरेशननंतरही त्याचे हृदय आणि मेंदूंची हालचाल मंदावली. डॉक्टरांनी त्याला वाचवण्याचा खूप प्रयत्न केले पण आज सायंकाळी नऊ वाजता त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

सरकारी मदती वरुन राजकारण सुरु

संदेश दळवी याच्या मृत्यू नंतर सरकारी मदती वरुन राजकारण सुरु झाले आहे. संदेश दळवी याच्या मृत्यू नंतर सरकारने अद्याप दखल घेतलेली नाही तसेच कुटुंबियांना मदतीची घोषणा केलेली नाही असा आरोप शिवसेनेने केला आहे. यावर भाजप नेते प्रविण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या गोविंदाच्या मृत्युचं कोणी राजकारण करू नये. सरकार संवेदनशील आहे. गोविंदाना प्रथमच 10 लाखाचा विमा दिला आहे. या मृत गोविंदाच्या कुटुंबियांना सर्व मदत सरकार देणार आहे. गोविंदाच्या मृत्यूचं भांडवल म्हणजे मेलेल्याच्या टाळूवरील लोणी खाताय का ? असा सवाच दरेकर यांनी उपस्थित केलाय.

मृत गोविंदाच्या वारसाला10 लाखांची मदत

गोविंदा उत्सव निर्बंधमुक्त साजरा करण्याची घोषणा करतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोविंदाना मोठ्या आर्थिक मदतीची देखील घोषणा केली होती. गोविंदा पथकातील खेळाडुचा दहीहंडीच्या थरावरुन पडून मृत्यू झाल्यास कायदेशीर वारसास 10 लाख रुपयाचे आर्थिक सहाय्य करण्यात येईल. दहीहंडीच्या थरावरुन प्रत्यक्ष पडून दोन्ही डोळे अथवा दोन्ही हात, दोन्ही पाय अथवा कोणतेही महत्त्वाचे दोन अवयव निकामी झाल्यास त्याला 7 लाख 50 हजार रुपये इतके आर्थिक सहाय्य करण्यात येईल. दहीहंडीच्या थरावरुन पडल्याने एक हात किंवा एक पाय किंवा कोणताही एक महत्त्वाचा अवयव निकामी झाल्यास किंवा गंभीर इजा झाल्यास त्याला 5 लाख इतके आर्थिक सहाय्य केले जाईल अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती.

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI