
लोकशाहीर कॉम्रेड अण्णा भाऊ साठे यांचा जन्म दिन १ ऑगस्ट रोजी साजरा होत आहे. हिंदूधर्मातील विषमतेमुळे जातीव्यवस्थेचे चटके बसल्याने,अस्पृश्यतेच्या जाचामुळे बालपणीच वाटेगावची शाळा सोडावी लागली.मुंबईतील गिरणीत बाल कामगार म्हणून काम करताना माटुंग्याच्या लेबर कॅम्पमध्ये राहातानाच १९३४-३५ साली तेथे राहणाऱ्या दलित आणि शोषित कष्टकऱ्यांसाठी झगडणाऱ्या कम्युनिस्ट पक्षाचे नेते, कार्यकर्ते कॉ.आर.बी.मोरे,कॉ. के.एम.साळवी,कॉ. शंकर नारायण पगारे आदींशी त्यांची ओळख झाली. त्यांचा १ ऑगस्ट हा जन्म दिन ( जयंती) लेखन प्रेरणा दिन’ घोषित करण्याची मागणी लोक सांस्कृतिक मंचाचे सेक्रेटरी सुबोध मोरे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केली आहे.
अण्णा भाऊ साठे कम्युनिस्ट कार्यकर्त्यां सोबत काम करतानाच, त्यांच्याकडून धुळाक्षरे गिरविण्यास सुरवात केली आणि ते कार्यकर्त्यांच्या बरोबरीने लिहायला, वाचायला शिकले.त्यांची सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विषयांवरील समज वाढू लागली.त्यांच्यातील उपजत असलेला कवी, लेखक, कलावंत आपल्या गाण्यातून,पोवाड्यातून व्यक्त होऊ लागला.त्यांनी आयुष्यातील पहीलं गाणं,धारावीला लागुन असलेल्या लेबर कॅम्पच्या झोपडपट्टीतील मच्छरावर लिहिले.नंतर त्यांनीं धनिकांकडून होणाऱ्या कामगारांच्या शोषणाविरुद्ध, “एकजुटीचा नेता झाला कामगार तय्यार ..किंवा धर्मांधांच्या छळवणूकीवर प्रहार करणारे
” जग बदल घालूनी घाव, सांगुनी गेले मला भीमराव..हे गीत लिहीले होते.
सुप्रसिद्ध मुंबईची लावणी,माझी मैना,अशी अनेक गाजलेली गाणी लिहिली.आणि हळूहळू पुढे ते लोकनाट्य ,कथा, कादंबरी,लिहू लागले. वारणेचा वाघ, चित्रा,वैजयंता फकिरा कादंबरी नंतर एक सर्जनशील, समर्थ लेखक म्हणून कॉ. अण्णा भाऊ साठे यांची देशाला आणि जगाला ओळख झाली.त्यांच्या साहित्याला अनेक पुरस्कार मिळाले. त्यांच्या कथा, कादंबऱ्यांचे जगातील अन्य भाषात अनुवाद झाले.
लोकशाहीर कॉम्रेड अण्णा भाऊ साठे यांचा १ ऑगस्ट हा जयंती दिन केवळ महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशभरात “लेखन प्रेरणा दिन” म्हणून घोषित करण्यात यावा आणि त्याची सुरुवात महाराष्ट्र शासनाने पुढाकार घेऊन करावी.तसेच,देश पातळीवरही हा दिवस “लेखन प्रेरणा दिन” म्हणून साजरा होण्यासाठी शासनाने आणि मुख्यमंत्र्यांनी पाठपुरावा करावा असे आवाहन करण्यात आले आहे. कॉम्रेड अण्णा भाऊ साठे यांचा जन्म दिन हा जर राष्ट्रीय स्तरावर “लेखन प्रेरणा दिन” म्हणून घोषित झाला तर, त्या दिवशी देशातील प्रत्येक शाळा, महाविद्यालयात, अण्णा भाऊंच्या जीवन, साहित्यावर कार्यक्रम घेणे शासनाला बंधनकारक होईल.
त्या निमित्ताने विद्यार्थी, शिक्षकांना अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य वाचावे लागेल, ते साहित्य भारतातील सर्व भाषात शासनाला अनुवाद करावे लागेल, त्यामुळे अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य देशभर वाचले जाईल. आणि या सर्व गोष्टी झाल्या तर देशभरातील सर्व अण्णा भाऊ साठे प्रेमी, चाहते यांचा आनंद द्विगुणित होईल!
आज महाराष्ट्र शासन ” कुसुमाग्रज दिन ” साजरा करते. माजी राष्ट्रपती डॉ ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा जन्म दिन केंद्र सरकार “वाचन प्रेरणा दिन” म्हणून साजरा करते. त्यानिमित्ताने सगळीकडे त्यांच्या साहित्यावर कार्यक्रम घेणे बंधनकारक झाले आहे.