
मोठी बातमी समोर येत आहे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज दिल्ली दौऱ्यावर असून, गाठीभेटींना वेग आला आहे. काही वेळापूर्वीच एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. त्यानंतर आता ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील भेटणार आहे. आज एकनाथ शिंदे यांनी आपल्या सर्व खासदारांसह अमित शाह यांची भेट घेतली, या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं होतं. आता या भेटीवर एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
आज राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली, या भेटीनंतर आता त्यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. ‘ सर्व खासदारांसोबत मी आज गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. ही सदिच्छा भेट होती. खासदारांचे देखील काही विषय होते, ते या भेटीदरम्याान मी मांडले. मागच्या आठवड्यात देखील मी आलो होतो. त्यावेळी मी अमित शाह यांना भेटलो नव्हतो. आज सदिच्छा भेट झाली आणि खासदारांसदर्भातील काही विषय होते, ते ही मांडले. मी तर जाहीरपणे भेटतोय, खासदारांसोबत भेटतोय, जे काही विकासात्मक प्रकल्प आहेत, केंद्र आणि राज्य सरकार यांचे, जे प्रकल्प राज्य सरकार आणि केंद्र सरकार मिळून सुरू आहेत, अशा प्रकल्पांसंदर्भात देखील या भेटीमध्ये चर्चा झाली. दिल्लीमध्ये अधिवेशन सुरू आहे, मी लपून छपून काही काम करत नाही. मी जे करतो ते सगळ्यांच्या समोर करतो,’ असं या भेटीवर प्रतिक्रिया देताना एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
पंतप्रधान मोदींचीही घेणार भेट
एकनाथ शिंदे हे दिल्ली दौऱ्यावर आहेत, आपल्या या दिल्ली दौऱ्यामध्ये त्यांच्या काही महत्त्वाच्या नेत्यांसोबत भेटीगाठी सुरू आहेत. थोड्यावेळापूर्वी त्यांनी अमित शाह यांची भेट घेतली, ते आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देखील भेट घेणार आहेत. दरम्यान काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी देखील अमित शाह यांची भेट घेतली होती.