
ज्या कुटुंबांचं आर्थिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील महिलांसाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत लाभार्थी महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये मिळतात. ही योजना महिला वर्गामध्ये चांगलीच लोकप्रिय ठरली आहे. मात्र ही योजना सुरू करत असताना सरकारने या योजनेसंदर्भात काही अटी देखील घातल्या होत्या, परंतु या योजनेच्या निकषात बसत नसताना सुद्धा अनेक महिला या योजनेचा लाभ घेत असल्याचं आता समोर आलं आहे. त्यामुळे अशा महिलांची नावं या योजनेतून वगळ्याचं काम सुरू आहे.
सरकारने घातलेल्या अटीनुसार ज्या कुटुंबांचं आर्थिक उत्पन्न हे अडीच लाख रुपयांपेक्षा कमी आहे, तसेच ज्या महिलेच्या नावावर कुठलंही चारचाकी वाहन नाही, ज्या महिलांचं वय हे 65 वर्षांपेक्षा कमी आहे. अशाच महिला या योजनेसाठी पात्र आहेत. त्याचप्रमाणे एका कुटुंबातील केवळ दोन महिलांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. मात्र अनेक महिला या निकषात बसत नसताना देखील लाडकी बहीन योजनेचा लाभ घेत असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे आता सरकारने केवायसी बंधनकारक केलं आहे. केवायसीच्या माध्यमातून लाभार्थी महिलांची ओळख पटवली जाणार आहे, तसेच ज्या महिला या योजनेच्या निकषात बसत नाहीत, त्यांचं नाव या योजनेतून वगळ्यात येणार आहे.
दरम्यान सरकार सातत्यानं या योजनेमधून लाभ घेणाऱ्या महिलांची नावं कमी करत असल्यामुळे ही योजना बंद पडणार आहे, असा आरोप आता विरोधकांकडून होत आहे, विरोधकांच्या या आरोपांमुळे लाभार्थी महिलांमध्ये देखील संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे, खरच ही योजना बंद होणार का? अशी शंका काहींच्या मनात आहे. ही शंका दूर करण्याचं काम आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. ‘कोणी माईचा लाल आला तरी लाडकी बहीण योजना बंद करणार नाही, लाडक्या बहिणी, शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावू हेच आमचे काम आहे’ असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.