
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे चिरंजीव पार्थ पवार (Parth Pawar) यांच्या जमीन खरेदीचं प्रकरण सध्या खूप गाजतंय. कोरेगाव पार्क येथील जमीन खरेदी करताना गैरव्यवहार झाल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. 1800 कोटी मूल्य असलेली जमीन 300 कोटी रुपयांत विकत घेतली, तसेच स्टँप ड्युटी म्हणून अवघे 500 रुपये भरले असे आरोप पार्थ पवार यांच्या वर होत असून त्यामुळे राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. विरोधकांनी हे प्रकरण लावून धरत पार्थ पवार, त्यांचे वडील, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधत कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.
पार्थ पवार अडचणीत सापडलेल्या या जमीन गैरव्यवहार प्रकरणात आत्तापर्यंत शीतल तेजवानी (Shital Tejawani) , दिग्विजय पाटील आणि निलंबित उपनिबंधक रवींद्र तारू, या तीन जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. मात्र आता याच प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. गुन्हा दाखल झालेल्या शीतल तेजवानी या फरार झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे.
कुठे आहे शीतल तेजवानी ?
मिळालेल्या माहितानुसार, बावधन पोलीस ठाण्यात शीतल तेजवानी विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी पॉवर ऑफ ॲटर्नी ही शीतल तेजवानी यांच्याकडे होती, त्यामुळे तेजवानी विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. मात्र गेल्या दोन दिवसांपासून तिचा फोन बंद आहे. तिचा वास्तव्याचा जो पत्ता आहेत, तिथेही बावधन पोलिसांनी चौकशी केली, मात्र शीतल तेजवानी त्या पत्त्यावरील घरात आढळली नाही. त्यामुळे कदाचित शीतल तेजवानी ही परदेशात गेली असावी अशी शक्यता पोलिस विभागाकडून व्यक्त केली जात आहे.
Ambadas Danve : जो न्याय खडसेंना तोच पार्थ पवारांना का नाही ? जमीन घोटाळ्यावरून अंबादास दानवे आक्रमक
यासंदर्भात इमिग्रेशन विभागाला बावधन पोलिसांकडून पत्र पाठवलं जाऊ शकतं. मात्र सध्या शीतल तेजवानी ही फरार असल्याचं बोललं जात आहे. या जमीन गैरव्यवहार प्रकरणात शीतल तेजवानी , दिग्विजय पाटील आणि रवींद्र तारूंविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बावधन पोलिसांकडून या तिघांचाही शोध घेतला जात आहे. त्यासाठी वेगवेगळी पथकांची नेमणूक करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. बावधन पोलिसांकडून या सर्व प्रकरणाचा कसून तपास केला जात आहे. शीतल तेजवानी हिला लवकरता लवकर अटक होते का, पोलिसांकडून या प्रकरणात काय कारवाई केली जाते, ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.