दादा तुमचा जगाचा निरोप घेण्याचा निर्णय चुकला, तो मागे घ्या आणि परत या… एकनाथ शिंदे विधानसभेत भावूक

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु करताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाचा शोकप्रस्ताव मांडला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील त्यांच्याविषयी बोलताना भावूक झाले आहेत.

दादा तुमचा जगाचा निरोप घेण्याचा निर्णय चुकला, तो मागे घ्या आणि परत या... एकनाथ शिंदे विधानसभेत भावूक
एकनाथ शिंदे आणि अजित पवार
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Feb 23, 2026 | 1:20 PM

आज राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु झाले आहे. या अधिवेशनला सुरुवात करताना देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिवंगत नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर शोकप्रस्ताव मांडला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील त्यांच्याविषयी बोलताना भावूक झाले आहेत.

“हा जगाचा निरोप घेण्याचा निर्णय मात्र चुकला आहे. तो मागे घ्या”

लाखांचा पोशिंदा जावा आणि लाखो लोक अनाथ व्हावेत, अशीच काहीशी अवस्था अजितदादांच्या जाण्याने झाली आहे. दादा, राजकारणात आपण घेतलेले अनेक निर्णय अचूक होते हे जनतेच्या न्यायालयाने सिद्ध केले आहे, पण तुमचा हा जगाचा निरोप घेण्याचा निर्णय मात्र चुकला आहे. तो मागे घ्या आणि परत या, अशा भावूक शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिवंगत नेते अजित पवार यांना विधान परिषदेत श्रद्धांजली वाहिली.

“२८ जानेवारीच्या त्या काळ्या दिवसाने आमचा हा आधार हिरावून नेला”

एकनाथ शिंदे यांनी यावेळी माजी मंत्री सुरूपसिंग हिऱ्या नाईक, माजी विधान परिषद सदस्य अशोक गजानन मोडक, गंगाधर पटने, श्रीमती निला देसाई या दिवंगत सदस्यांना देखील श्रध्दांजली अर्पण केली. अजितदादांच्या आठवणींना उजाळा देताना एकनाथ शिंदे म्हणाले की, मी, देवेंद्रजी आणि अजितदादा म्हणजे राज्याच्या स्थैर्याचा एक भक्कम ‘ट्रँगल ऑफ स्टॅबिलिटी’ होतो. आम्ही तिघे एकत्र आलो म्हणून महाराष्ट्राची भूमिती आणि प्रगती वेगाने सुरू होती. २८ जानेवारीच्या त्या काळ्या दिवसाने आमचा हा आधार हिरावून नेला. दादा वेळ कधीच चुकवत नसत, पण त्या दिवशी नियतीने मात्र घात केला. टीव्हीवर त्या अपघाताची दृष्ये पाहिली आणि मनाचा थरकाप उडाला.

पुढे ते म्हणाले, प्रशासनावर त्यांची जबरदस्त पकड होती. फाईल हातात घेतल्यावर काही सेकंदात त्यांची नजर कागदावरून स्कॅन व्हायची आणि त्यातील चुका ते चटकन शोधायचे. साध्या वायर लटकत असल्या किंवा पायरी नीट बसवलेली नसली तरी ते अधिकाऱ्यांना झापायचे. ११ वेळा राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम दादांच्या नावावर होता. दादा बाहेरून फणसासारखे कडक वाटत असले तरी आतून ते अत्यंत मृदू मनाचे होते. लाडकी बहीण योजनेसाठी ४६ हजार कोटींची तरतूद करताना त्यांनी अर्थकारणाचा समतोल उत्तम राखला होता.