बारामती जिंकण्यासाठी भाजपची गोळाबेरीज, तब्बल 12 ते 15 लाख मतांचं गणित

| Updated on: Apr 19, 2024 | 9:35 PM

महायुतीच्या समीकरणानं बारामती लोकसभेत भाजपनं मतांची गोळाबेरीज केलीय. नेत्यांच्या गणितावरुन 12 ते 15 लाख मतं आमच्यासोबत असल्याचा दावा देवेंद्र फडणवीसांनी केला. तरीही बारामतीची आकडेवारी काय सांगते? आणि कागदावर सध्या बारामतीत कुणाचं पारडं जड आहे? हे पाहणंदेखील महत्त्वाचं आहे.

बारामती जिंकण्यासाठी भाजपची गोळाबेरीज, तब्बल 12 ते 15 लाख मतांचं गणित
सुनेत्रा पवार, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा फोटो
Follow us on

गेली 50 वर्ष भाजप बारामतीत विजयाचा प्रयत्न करतेय. पण यंदा पवारांमध्येच फूट पडलीय आणि बदललेल्या गणिताच्या आधारावर भाजपला बारामतीत इतिहास घडण्याचा विश्वास आहे. कालच्या सभेत उपस्थित नेत्यांच्या मतांची गोळाबेरीज 12 ते 15 लाखांच्या घरात आहे. त्यामुळे यंदा सुनेत्रा पवारांना कुणीही रोखू शकत नसल्याचा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. 2019 ला बारामतीत नंबर दोन आणि नंबर तीनवर राहिलेले उमेदवार यंदा भाजपसोबत आहेत. 2019 ला सुप्रिया सुळेंविरोधात भाजपच्या कांचन कूल आणि वंचितचे नवनात पडळकर लढले होते. सुप्रिया सुळेंना 6 लाख 86 हजार 714, कांचन कूल यांना 5 लाख 30 हजार 940, तर वंचितच्या 44 हजार 134 मतं पडली होती. यंदा सुळे एका बाजूला आहेत. सुनेत्रा पवारांसोबत युतीमुळे कांचन कूल आहेत, आणि वंचितनं उमेदवार दिला नसला तरी गेल्यावेळचे वंचितचे
उमेदवार वंचित सोडून भाजपमध्ये गेले आहेत.

2019 च्या लोकसभेत राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळेंनी भाजपच्या कांचन कूल यांचा 1 लाख 55 हजार मतांनी पराभव केला होता. गेल्यावेळच्या लोकसभेवेळी सुप्रिया सुळेंसोबत बारामतीचे आमदार अजित पवार, इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे, भोरचे आमदार संग्राम थोपटे सोबत होते. तर भाजपच्या कांचन कूल यांच्यासोबत दौंडमधले रासपचे आमदार राहुल कूल, पुरंदरचे आमदार विजय शिवतारे, खडकवासलाचे आमदार भीमराव तापकीर होते.

सुप्रिया सुळे यांच्यासोबत यंदा कोण-कोण?

यंदा सुळेंसोबत भोरचे संग्राम थोपटे आणि पुरंदरचे आमदार संजय जगताप आहेत. तर सुनेत्रा पवारांसोबत स्वतः अजित पवार, इंदापूरचे दत्तात्रय भरणे, दौंडच्या कांचन कूल, खडकवासल्याचे तापकीर, यांच्यासोबतच माजी आमदार विजय शिवतारे, हर्षवर्धन पाटलांची साथ असणार आहे.

गेल्यावेळचं विधानसभानिहाय लीड बघितल्यास, भोरमध्ये सुळेंना 19 हजारांचं लीड होतं. पुरंदरमध्ये 9 हजार 600 चं, इंदापुरात 70 हजारांचं, आणि बारामतीत 1 लाख 27 हजारांच लीड मिळालं होतं. तर भाजपच्या कांचन कूल यांना दौंडमध्ये 7 हजार 53 मतांचं आणि खडकवासल्यात 65 हजारांचं लीड होतं.

भाजपचं मतांचं नेमकं गणित काय?

फडणवीसांचा दावा आहे की मंचावरच्या नेत्यांनुसार त्यांच्याकडे १२ ते १५ लाखं मतं आहेत. 2019 ला बारामती लोकसभेत एकूण मतदारांची संख्या 21 लाख 14 हजार 663 इतकी होती. त्यापैकी 61.7 टक्के म्हणजे 13 लाख 4 हजार 728 मतदान झालं होतं. 2024 ला अंदाजे अडीच लाख मतदारांची वाढ धरली तर एकूण मतदार साडे 23 लाख होतात. समजा यंदा गेल्यावेळप्रमाणे 61.7 टक्के मतदान झाल्यास एकूण मतदान 14 लाख 49 हजार इतकं होईल.

बारामती लोकसभेत कागदावर भाजप मजबूत आहे. मात्र यंदा मतदानाची टक्केवारी किती वाढते, वाढीव मतदान कुणाला जातं? यावर सर्व गणितं अवलंबून असणार आहेत. तूर्तास ही भावकीची निवडणूक नाही, असं अजित पवार म्हणत आहेत. चंद्रकांत पाटलांच्या मते बारामतीत शरद पवारांचा पराभव आम्हाला हवाय. तर बारामतीत सुळे विरुद्ध पवार नसून मोदी विरुद्ध राहुल गांधी लढाई असल्याचं फडणवीसांनी म्हटलंय.