छत्रपती संभाजी महाराजांबद्दल केआरकेच्या वादग्रस्त ट्विटप्रकरणी फडणवीसांची आक्रमक भूमिका

कमाल आर. खानने छत्रपती संभाजी महाराजांबद्दल अत्यंत आक्षेपार्ह ट्विट केलं आहे. याविरोधात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. विकिपीडियाच्या आधारे केआरकेनं हा मजकूर पोस्ट केला होता.

छत्रपती संभाजी महाराजांबद्दल केआरकेच्या वादग्रस्त ट्विटप्रकरणी फडणवीसांची आक्रमक भूमिका
Devendra Fadnavis and KRK
Image Credit source: Instagram
| Updated on: Feb 18, 2025 | 3:17 PM

स्वयंघोषित चित्रपट समीक्षक कमाल आर. खान ऊर्फ केआरके याने छत्रपती संभीज महाराजांबद्दल एक्स (ट्विटर) अकाऊंटवर आक्षेपार्ह पोस्ट लिहिली आहे. छत्रपती संभाजी महाराजांबद्दल ट्विट करताना केआरकेनं सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. केआरकेनं विकिपीडियाचा आधार घेत पोस्ट लिहिली होती. विकिपीडियाशी संपर्क साधून वादग्रस्त मजकूर काढण्याचे आदेश फडणवीसांनी दिले आहेत. सायबर विभागाचे आयजी यशस्वी यादव यांना फडणवीसांनी हे आदेश दिले आहेत.

“विकिपीडियावर छत्रपती संभाजी महाराजांबद्दल जो वादग्रस्त मजकूर लिहिण्यात आला आहे, त्याप्रकरणी सायबर विभागाचे आयजी यशस्वी यादव यांच्याशी संपर्क साधला आहे. विकिपीडिया आणि त्याच्याशी संबंधित यंत्रणेशी संपर्क साधून तो मजकूर काढून टाकण्याचे आदेश त्यांना दिले आहेत. त्यासाठी जी प्रक्रिया करावी लागेल, ती तातडीने करावी, असं त्यांना सांगण्यात आलं आहे. अशा पद्धतीचा आक्षेपार्ह मजकूर ओपन सोर्सवर राहणं अत्यंत चुकीचं आहे. त्यामुळे ते तिथून काढून टाकण्यासाठीचे आदेश संबंधितांना देण्यात आले आहेत. छत्रपती संभाजी महाराज हे आमचे आदर्श आहेत, त्यांच्यासंदर्भात असले लेखन खपवून घेणार नाही”, अशी प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली.

“विकिपीडियावरील मजकूर ठराविक लोकांना एडिट करता येतो. आम्हाला कल्पना आहे की ते भारतातून संचालित होत नाही. त्यांचे काही नियम आहेत. ज्यांच्याकडे त्याचे एडिटोरीयल राईट्स असतात, त्यांच्यासाठी ऐतिहासिक गोष्टींबद्दल लिहिण्यासाठी काही नियमावली आखली जाऊ शकते का, याबद्दल आम्ही चर्चा करणार आहोत. ओपन सोर्सवर अशा पद्धतीने ऐतिहासिक गोष्टी तोडून-मोडून लिहिणाऱ्यांविरोधात नियमावली तयार करा अशा सूचना आपण देऊ. भौगोलिक रचनेमुळे नियमावली आणखं सोपं होतं. पण सोशल मीडियाची भौगोलिक चौकट नसल्याने नियम आणखं कठीण आहे. अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य असीमित नाही. दुसऱ्यांच्या स्वातंत्र्यावर घाला घालू शकत नाही,” असंदेखील फडणवीस म्हणाले.

ज्याठिकाणी अश्लीलता परिसीमेच्या बाहेर जाते, त्याठिकाणी कारवाई करणं गरजेचं असतं. यासंदर्भात काही नियमावली करता येईल का, याबाबत आमची केंद्र सरकारशी चर्चा सुरू आहे, असंही फडणवीसांनी स्पष्ट केलं.