‘लग्नात भेटल्यावर युती होते हे आधी…’, ठाकरे-चंद्रकांतदादांच्या भेटीवर देवेंद्र फडणवीस यांचं थेट उत्तर

CM Devendra Fadnavis: धनंजय मुंडे हे आमच्या मंत्रिमंडळातील मंत्री आहेत. त्यामुळे त्यांना भेटण्याची चोरी नाही. ते मला कधीही भेटू शकतात. मी त्यांना कधीही भेटू शकतो. कुठल्याही कामासाठी भेटू शकतो. त्यांच्या राजीनाम्याबाबत अजितदादांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे.

लग्नात भेटल्यावर युती होते हे आधी..., ठाकरे-चंद्रकांतदादांच्या भेटीवर देवेंद्र फडणवीस यांचं थेट उत्तर
devendra fadnavis
| Updated on: Jan 30, 2025 | 2:06 PM

CM Devendra Fadnavis: राज्यातील राजकारणात गेल्या काही वर्षांत धक्कादायक गोष्टी घडत आहेत. राज्यातील सर्वच राजकीय समीकरणे बदललेली आहेत. २५ वर्ष एकत्र असलेले उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि भाजप एकमेकांच्या विरोधात आहे. शिवसेनेत बंडखोरी झाली आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे आणि भाजप एकत्र येणार असल्याची चर्चा सुरु असते. आता चंद्रकांत पाटील आणि उद्धव ठाकरे यांची एका लग्नसमारंभात भेट झाली. त्या भेटीनंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि भाजप एकत्र येणार असल्याची चर्चा सुरु झाली. त्यावर भाजप नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी मार्मिक उत्तर दिले.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, लग्नात भेटणे हे स्वाभाविक आहे. मी तिथे असतो तर माझीही उद्धव ठाकरे यांच्यासोबत भेट झाली असती. त्यात फार काही विशेष नाही. पहिली गोष्ट तर लग्नात भेटल्याने पक्ष जवळ येतात किंवा युती होते इतका भाबडा विचार हा किमान तुमच्या सारख्या ज्येष्ठ पत्रकारांच्या डोक्यात येऊ नये, ही आमची अपेक्षा आहे, असा जोरदार टोला फडणवीस यांनी माध्यमांमधील राजकीय तत्ज्ञांना लगावला.

धनंजय मुंडे यांचा राजीनामा…

धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या विषयावर फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, धनंजय मुंडे त्यांच्या कामाच्या निमित्ताने आले होते. मी माझ्या कामाच्या निमित्ताने आलो आहे. त्यामुळे आमची भेट झाली नाही. पण सकाळी कॅबिनेटमध्ये आमची भेट झाली होती. धनंजय मुंडे हे आमच्या मंत्रिमंडळातील मंत्री आहेत. त्यामुळे त्यांना भेटण्याची चोरी नाही. ते मला कधीही भेटू शकतात. मी त्यांना कधीही भेटू शकतो. कुठल्याही कामासाठी भेटू शकतो. त्यांच्या राजीनाम्याबाबत अजितदादांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. अजितदादांची भूमिका हीच अधिकृत भूमिका आहे, असे स्पष्टपणे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

केंद्रीय अर्थसंकल्पाबाबत एक बैठक होते. त्या बैठकीला राज्याचे अर्थमंत्री जात असतात. आपल्या अर्थमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या काय अपेक्षा आहेत, या केंद्रीय अर्थमंत्र्यांना दिल्या आहेत. त्याबाबत चर्चाही झाली आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.