मी दोनदा मरता मरता वाचलो, आता फक्त डोळ्याचं… धनंजय मुंडेंचा मोठा खुलासा

धनंजय मुंडे यांनी बोधेगाव येथील कार्यक्रमात आपल्या जीवनातील संघर्ष मांडला. २५० दिवसांच्या मीडिया ट्रायलमध्ये आपण मरता मरता वाचलो, असे ते म्हणाले. आरोग्याच्या अडचणींवर मात करत लोकांच्या आशीर्वादामुळेच आज उभे असल्याचे सांगितले.

मी दोनदा मरता मरता वाचलो, आता फक्त डोळ्याचं... धनंजय मुंडेंचा मोठा खुलासा
Dhananjay Munde
| Updated on: Oct 20, 2025 | 8:28 AM

“ज्या घटनेशी आपला कोणताही संबंध नव्हता, त्या घटनेवरून सलग २५० दिवस इलेक्ट्रॉनिक मीडियावर माझी ट्रायल चालली. त्या अत्यंत कठीण काळात मी दोनदा मरता मरता वाचलो होतो. आज मी तुमच्या आशीर्वादामुळेच तुमच्यासमोर उभा आहे”, असे माजी मंत्री तसेच आमदार धनंजय मुंडे म्हणाले. परळी तालुक्यातील बोधेगाव येथील एका कार्यक्रमात धनंजय मुंडे यांनी भावनिक खंत व्यक्त केली.

माझा जन्म लोकांची सेवा करण्यासाठी

धनंजय मुंडे यांनी बोधेगाव येथे विविध विकास कामांच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त एक कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी त्यांनी त्यांच्या जीवनातील संघर्षाच्या आठवणींना उजाळा दिला. माझा जन्म लोकांची सेवा करण्यासाठी झाला, असे धनंजय मुंडे म्हणाले.

त्या कठीण काळात मी कुठल्याही माध्यमांवर बोललो नाही. मी प्रामाणिकपणे सांगतो, मी सगळ्या आजारांतून बाहेर पडलो आहे, फक्त आता डोळ्याचे थोडे बाकी आहे. पण माझा जन्म लोकांची सेवा करण्यासाठी झाला आहे, म्हणूनच मी आज तुमच्यासमोर आहे. मला फक्त तुमची सेवा करायची आहे, दुसरे काही नाही, असे धनंजय मुंडे यांनी सांगितले.

एवढा मोठा विजय साजरा करता आला नाही

यावेळी धनंजय मुंडेंनी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत विक्रमी विजयाचा उल्लेख केला. या निवडणुकीत मायबाप जनतेने मला १ लाख ४२ हजार मतांच्या प्रचंड आघाडीने निवडून दिले. मतांच्या आघाडीत महाराष्ट्रात आपण पहिल्या क्रमांकावर आहोत. मात्र, एवढा मोठा विजय मिळूनही आपल्याला तो साजरा करता आला नाही, अशी खंत धनंजय मुंडेंनी व्यक्त केली.

घडवून आणलेल्या संकटांमधून बाहेर पडणे कठीण

तसेच जी संकटं आली, ती अचानक आलेली संकटं होती आणि घडवून आणलेल्या संकटांमधून बाहेर पडणे कठीण असते. मला मिळालेल्या मंत्रिपदाचाही आनंद घेता आला नाही, अशा शब्दात धनंजय मुंडेंनी आपली वेदना मांडली. यावेळी धनंजय मुंडे यांच्या हस्ते बोधेगाव परिसरातील विविध विकास कामांचे लोकार्पण करण्यात आले.  बोधेगाव आणि पंचक्रोशीतील विविध विकासकामांचे लोकार्पण करताना, यापुढेही भागाच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे आश्वासन धनंजय मुंडे यांनी दिले. तसेच लोकांचे प्रेम आणि आशीर्वाद हीच आपली सर्वात मोठी ताकद आहे, असे सांगत त्यांनी उपस्थितांचे आभार मानले.