मुंबईत पिवळं वादळ धडकणार! आरक्षणासाठी धनगर समाज पुन्हा आक्रमक, दीपक बोराडे यांचा नवा प्लान ठरला
मुंबईत पिवळं वादळ धडकण्याची शक्यता आहे. एसटी समाजातून आरक्षणासाठी धनगर समाज पुन्हा आक्रमक झाला आहे . आता धनगर समाजाचे नेते दीपक बोराडे यांचा नवा प्लान ठरला आहे.

सागर सुरवसे, प्रतिनिधी : आरक्षणाच्या मुद्द्यावरून धनगर समाज पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. आता 1 डिसेंबर रोजी अहिल्यानगर येथे ईशारा मेळावा घेऊन मुंबईला जाण्याची तारीख ठरणार आहे. धनगर समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलक दिपक बोराडेंनी सरकारला मोठा इशारा दिला आहे. धनगर समाजाला एसटी प्रवर्गात घेण्याच्या मागणीसाठी दिपक बोराडे पुन्हा एकदा राज्यव्यापी दौऱ्यावर आहे. धनगर समाजाचे नेते दिपक बोराडे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन करत आरक्षणाची मागणी केली.
दीपक बोराडे म्हणाले,गेल्या आठ दशकापासून धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून वंचित ठेवण्याचे काम केलं. 2014 मध्ये निवडणुकी वेळी भाजपने धनगर समाजाला आरक्षण देऊ असं आश्वासन दिलं होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाखोच्या सभेत सांगितलं होतं, आम्हाला सत्ता द्या, धनगर समाज आरक्षणाचा अभ्यास झाला आहे, असं सांगितलं होतं. धनगर समाजामुळे राज्यात भाजपचे सरकार आलं, असं देवेंद्र फडणवीस साहेब किती वेळा तरी बोलले आहेत. पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस हे धनगराच्या उपकाराची जाणीव विसरले आहेत, त्यांनी दिलेला शब्द पाळला नाही. 17 सप्टेंबर 2025 ला आम्ही मराठवाड्यातून लढा सुरू केला आहे. आता सध्या पश्चिम महाराष्ट्रात आमचा लढा पोहोचला आहे’.
‘बारा वर्षापासून भाजप सरकार धनगर समाजाची फसवणूक करत आहे. धनगरांच्या भावनांशी खेळण्याचा पाप करत आहे. मोठ्या संघर्षासाठी धनगर बांधवांना तयार करण्याचं काम सुरू आहे. एक डिसेंबर रोजी अहिल्यानगरमध्ये धनगर समाजाचा महाएल्गार मेळावा होणार आहे. हा सरकारसाठी इशारा मेळावा असणार आहे. एक डिसेंबर रोजी होणाऱ्या एल्गार मेळाव्यातून मुंबईला जाण्याची तारीख जाहीर होणार आहे,असे दीपक बोराडे यांनी स्पष्ट केले. दरम्यान, मराठा समाजाने देखील आरक्षणासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. परंतु मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी सरकारला 90 दिवसांचा कालावधी सरकारला दिला आहे. मराठा समाजानंतर आता धनगर समाजानेही आरक्षणासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे सरकारची डोकेदुखी वाढणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.