
Dhangar Protest For Reservation : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटल्यानंतर आता धनगर समाजाच्या आरक्षणाचाही मुद्दा चांगलाच तापला आहे. आम्हाला एसटी प्रवर्गातून आरक्षण द्यावे, अशी मागणी धनगर समाजाकडून करण्यात येत आहे. याच मागणीला घेऊन राज्यभरात आंदोलन, निदर्शने केली जात आहेत. काही ठिकाणी रास्ता-रोकोदेखील केला जात आहे. दरम्यान, धनगर समाजाच्या या मागणीचा वणवा समस्त राज्यात पेटला आहे. त्यामुळे आता सरकारवर एका प्रकारे दबाव वाढताना दिसतोय. परभणी, जालना, सोलापूर, जळगाव अशा अनेक जिल्ह्यात आंदोलनाचे हे लोण पसरलेले आहे.
जळगाव जिल्ह्यातील रावेरमध्ये धनगर समाज आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झाला आहे. रावेरमध्ये ओंकारेश्वर-बऱ्हाणपूर महामार्गावर चक्काजाम करण्यात आला आहे. या आंदोलनामुळे वाहतुकीच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. धनगर समाज रस्त्यावर उतरून मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करत असून तासापासून चक्काजाम सुरू आहे. दुसरीकडे रावेरचे आमदार अमोल जावळे यांच्या निवासस्थानावर धनगर समाजाने ढोल बजाव आंदोलन करून निवेदन दिले आहे.
एसटी प्रवर्गात समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी परभणीत धनगर समाज रस्त्यावर उतरला असून, जिल्ह्यात अनेक ठिकाणी धनगर समाजकडून आज चक्काजाम आंदोलन करण्यात आले. धनगर समाजाकडून परभणी-गंगाखेड रस्ता अडवण्यात आला. या आंदोलनामुळे वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. या आंदोलनासाठी धनगर समाज मोठ्या संख्येने जमला होता.
जळगावात जिल्ह्यातील आकाशवाणी चौकात राष्ट्रीय महामार्गावर धनगर समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. धनगर समाजाच्या वतीने मानवी साखळी करून मुंबई-नागपूर महामार्ग तब्बल पाऊण तास रोखून धरण्यात आला. आरक्षणाच्या मागणीसाठी जळगाव शहरासह जिल्ह्यात वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये धनगर समाजाच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. रास्ता रोको आंदोलनामुळे महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प होती. यामुळे एक ते दोन किलोमीटर पर्यंत वाहनाच्या रांगा लागल्या होत्या. आंदोलनात या आंदोलनात महिलांचादेखील सहभाग होता. कोणत्याही समाजाला आरक्षण देण्यात आम्हाला आक्षेप नाही. मात्र आम्हालाही आरक्षण द्यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. या आंदोलनाच्या माध्यमातून जालना येथे सुरू असलेल्या दीपक बोराडे यांच्या अमर उपोषणालादेखील पाठिंबा देण्यात आला.
सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथे सकल धनगर समाजाच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. अहिल्यानगर ते टेंभुर्णी महामार्गावरील करमाळ्यातील मौलाली माळ येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी ढोल वाजवत धनगर समाजाकडून करमाळ्यात रस्ता अडवण्यात आला. धनगर समाजाला ST आरक्षण मिळावे म्हणून दीपक बोराडे यांचे पंधरा दिवसांपासून उपोषण सुरू असून सरकार याकडे लक्ष देत नसल्याने सकल धनगर समाजाच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे, येळकोट येळकोट जय मल्हार अशी घोषणाबाजी यावेळी करण्यात आली.
जालना जिल्ह्यातही ठिकठिकाणी हे आंदोलन चालू आहे. धनगर समाज बांधवांने सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. जामखेड फाट्यावर मोठ्या संख्येने धनगर समाज बांधवांची रास्तारोको करण्यात आला. या रास्तारोको आंदोलनामुळे सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करून तत्काळ अंमलबजावणी करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.