महाराष्ट्र हादरला! जुन्या भांडणाचा डोक्यात राग, मित्रांनीच काढला काटा; गुन्हा लपवण्यासाठी मोठं कांड…

Dharashiv Crime : धाराशिव जिल्ह्यातील परांडा तालुक्यातील कंडारी ते सोनारी रस्त्यावर झालेल्या एका संशयास्पद अपघातामागे खुनाचे गंभीर षडयंत्र असल्याचे उघड झाले आहे. दोन मित्रांनी आपल्याच मित्राची हत्या केल्याचे समोर आले आहे.

महाराष्ट्र हादरला! जुन्या भांडणाचा डोक्यात राग, मित्रांनीच काढला काटा; गुन्हा लपवण्यासाठी मोठं कांड...
Dharashiv Murder
Image Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Dec 17, 2025 | 10:54 PM

राज्यातील गुन्हेगारी घटनांमध्ये झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. अशातच आता धाराशिव जिल्ह्यातील परांडा तालुक्यातील कंडारी ते सोनारी रस्त्यावर झालेल्या एका संशयास्पद अपघातामागे खुनाचे गंभीर षडयंत्र असल्याचे उघड झाले आहे. जुन्या भांडणाच्या रागातून दोन मित्रांनी आपल्याच 35 वर्षीय मित्राच्या डोक्यात जड वस्तूने वार करून क्रूरपणे खून केल्याचा आरोप मयताच्या पत्नीने केला आहे. आंबी पोलिसांनी या घटनेत तात्काळ सूत्रे फिरवत, खुनाचा गुन्हा नोंदवून दोन्ही संशयित आरोपींना रात्रीच ताब्यात घेतले असून, या घटनेमुळे कंडारी परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

नेमकं काय घडलं?

मयत मोतीराम जाधव हे सोमवार रात्री 9 च्या सुमारास कुटुंबासह घरी जेवण करत होते. त्याच वेळी त्यांचे मित्र विष्णु कालीदास तिंबोळे आणि योगेश नागेश तिंबोळे हे मोटारसायकलवरून त्यांच्या घरी आले. त्यांनी मोतीराम यांना पप्पू रावखंडे यांच्या बंगल्यावर पार्टी केली आहे, तिकडे जेवण करायला चल, असे सांगून त्यांना चालू जेवणाच्या ताटावरून उठवले आणि मोटारसायकलवर बसवून सोबत घेऊन गेले. रात्री 10 च्या सुमारास मोतीराम यांना घेऊन गेलेल्या दोन मित्रांपैकी विष्णु तिंबोळे हा एकटाच मोतीराम यांच्या घरी परतला आणि त्याने कंडारी ते सोनारी रोडवर पप्पु रावखंडे यांच्या बंगल्यासमोर अपघात झाल्याचे सांगितले.

विष्णु तिंबोळेने दिलेल्या माहितीनुसार मयताची पत्नी सोनाली जाधव आणि आई रतन यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असता, मोतीराम जाधव हे रस्त्यावर पडलेले होते. त्यांच्या डोक्याला मोठी दुखापत झाली होती, चेहरा ठेचला गेलेला होता आणि रस्त्यावर मोठ्या प्रमाणात रक्त सांडलेले होते. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे काही ठिकाणी सांडलेल्या रक्तावर पाणी आणि माती टाकलेली दिसून आली. अपघातात तिघांपैकी केवळ मोतीराम यांचाच अपघात कसा झाला, असा जाब पत्नीने विचारला असता आरोपी मित्रांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. यामुळे अपघाताबाबतचा संशय बळावला.

या घटनेनंतर सोनाली जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मोतीराम जाधव, विष्णु तिंबोळे आणि योगेश तिंबोळे यांच्यात जुन्या भांडणावरून वाद होता. हे भांडण तात्या रावखंडे व पप्पु रावखंडे यांनी सोडवण्याचा प्रयत्नही केला होता, ज्यात तात्या रावखंडे हे जखमी झाले होते. जुन्या भांडणाच्या रागातून विष्णु तिंबोळे व योगेश तिंबोळे यांनी मोतीराम जाधव यांच्या डोक्यात जड वस्तूने वार करून त्यांचा खून केला आणि अपघाताचा बनाव करण्याचा प्रयत्न केला, असा गंभीर आरोप फिर्यादीने केला आहे.

पोलिसांची तात्काळ कारवाई, आरोपींना अटक

घटनेची माहिती मिळताच आंबी पोलीस ठाण्याचे सपोनि गोरक्ष खरड व पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. फिर्यादीतील गंभीर आरोप आणि घटनास्थळावरील परिस्थिती (रक्तावर माती टाकणे, अपघाताबाबतचा संशय) लक्षात घेऊन पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान केली. आंबी पोलिसांनी आरोपी विष्णु कालीदास तिंबोळे आणि योगेश नागेश तिंबोळे यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदवला आहे. घटनेनंतर काही तासांतच दोन्ही संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांची कसून चौकशी सुरू आहे. हा अपघात नसून, पूर्ववैमनस्यातून केलेला खून आहे का, डोक्यात कोणत्या जड वस्तूने मारले गेले, तसेच तात्या रावखंडे यांना झालेल्या दुखापतीचा आणि खुनाचा काय संबंध आहे, याचा सखोल तपास पोलीस करीत आहेत.

पंचनाम्यात रक्ताचे डाग धुण्याचा प्रयत्न उघड…

पोलीस आणि फॉरेन्सीक टीमकडून करण्यात आलेल्या पंचनाम्यात हा अपघात नसून घातपातच असल्याचे स्पष्ट झाले आहे. कंडारी – सोनारी रस्त्यावर घटनास्थळी तात्या रावखंडे यांच्या घराशेजारील पत्र्याच्या शेडमध्ये रक्ताचे डाग दिसून आले. या ठिकाणाहून रस्त्यापर्यंत रक्ताचे डाग दिसत होते. एवढेच नव्हे तर, काही ठिकाणी रक्ताचे डाग पाण्याने धुऊन काढले असून, काही ठिकाणी माती व वाळू टाकून रक्ताचे निशाण लपवण्याचा प्रयत्न झाल्याचे पंचनाम्यात स्पष्ट झाले आहे. यावरून आरोपींनी खुनानंतर पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते. आता पोलीस अधिक तपास करत आहेत.