
नुकताच महापालिका निवडणुकांचा निकाल जाहीर झाला. राज्यात 29 महापालिकांसाठी निवडणूक झाली. भाजप या निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरला. अनेक महापालिकांमध्ये भाजप सत्ता स्थापन करण्याच्या स्थितीमध्ये आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची कामगिरी सुद्धा समाधानकारक आहे. कल्याण-डोंबिवली, ठाणे हे आपले गड एकनाथ शिंदे यांनी अबाधित ठेवले. फक्त मुंबई पालिका निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेला अपेक्षित यश मिळालं नाही. पण 29 जागा जिंकून मुंबईच्या राजकारणात त्यांना संघटनेच जाळं नव्याने विणण्याची चांगली संधी आली आहे. महापालिकेनंतर आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागल्या आहेत. या जिल्हा परिषदांमध्ये काही ठिकाणी महायुती तर काही ठिकाणी शिवसेना-भाजप परस्परांविरोधात निवडणुका लढवू शकतात.
आता धाराशिव जिल्हा परिषदेच्या निवडणुकीवरुन एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतच दोन गट पडल्याचं चित्र आहे. भाजप–शिवसेना युतीवरून आता थेट शिवसेना नेत्यांमध्येच गटबाजी सुरु झाली आहे. धाराशिव येथे तानाजी सावंत यांनी घेतलेल्या बैठकीकडे धाराशिव शिवसेना निरीक्षक राजन साळवी आणि पालकमंत्र्यांनी पाठ फिरवली. एकीकडे मुंबईत पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी भाजप–शिवसेना युती म्हणूनच निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं आहे. मात्र दुसरीकडे धाराशिव जिल्ह्यात वास्तव वेगळंच दिसत आहे.शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत हे जिल्हा परिषद निवडणुकीसाठी स्वतंत्र उमेदवार उभे करत असल्याची ठोस माहिती समोर येत आहे.
युतीचा दावा केवळ कागदावरच आहे का?
या घडामोडींमुळे आता शिवसेनेमध्येच युतीच्या मुद्द्यावरून दोन गट पडल्याचं स्पष्ट चित्र समोर आलं आहे. मुंबईतील निर्णय आणि धाराशिवमधील कृती यामध्ये मोठी दरी दिसत असून, युतीचा दावा केवळ कागदावरच आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
युती प्रत्यक्षात होणार की तुटणार?
या सगळ्या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्ह्यात राजकीय वातावरण तापलं आहे. शिवसेना आमदार तानाजी सावंत आणि भाजपाचे आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांच्यातील राजकीय संघर्षामुळे भाजप–शिवसेना युती प्रत्यक्षात होणार की तुटणार? असा प्रश्न निर्माण झालाय. स्थानिक पातळीवरील या कुरबुरींचा महायुतीला फटका बसू शकतो.