Shivsena : मोठी बातमी ! शिवसेना पक्षाची सुनावणी पुन्हा लांबणीवर ? त्या ट्विटमुळे खळबळ
शिवसेना पक्षातील फुटीनंतर 'मूळ शिवसेना' आणि 'धनुष्यबाण' चिन्हाचा वाद सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. सततच्या तारखांनंतरही अंतिम निकाल अनिश्चित असून, आजची सुनावणी देखील होण्याची शक्यता कमी आहे. ॲड. असीम सरोदे यांनी ही माहिती दिली आहे. यामुळे ठाकरे आणि शिंदे गटातील सत्तासंघर्षाचा निकाल आणखी लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत.

साधारण तीन-साडेतीन तीन वर्षांपूर्वी शिवसेना पक्षात फूट पडली आणि शिवसेना शिंदे गट व उद्धव ठाकरे गट असे दोन गट पडले. मूळ शिवसेना कोणाची ? धनुष्यबाण चिन्ह कोणाचं ? या मुद्यावर गेल्या बऱ्याच काळापासून सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी सुरू आहे. या खटल्याचा निकाल लवकरच लागले, उद्याच अंतिम निकाल येईल असं वाटत राहतं, मात्र सतत तारीख पे तारीख सुरू आहे. अखेर आज मूळ शिवसेना पक्षाची सुनावणी सुरू करण्यात येईल असं सुप्रीम कोर्टाने मागल्या तारखेल सांगून ठेवलं होतं. मात्र आता आजची सुनावणी देखील होण्याची चिन्ह अतिशय कमी आहेत. याप्रकरणी ठाकरेंची बाजू मांणारे ॲड. असीम सरोदे यांनीच सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून हा अंदाज व्यक्त केला आहे. आज “शिवसेना सत्तासंघर्ष- पक्ष पळविणे, धनुष्यबाण चिन्ह” याबाबतची सुनावणी घेतली जाईल अशी आशा करता येणार नाही असे सरोदे यांनी म्हटले आहे. त्यामुळेच शिवसेना मूळ कोणाची, धनुष्यबाण नेमका कोणाला मिळणार याचा निकाल अद्याप लांबणीवरच असल्याचे दिसते.
काय म्हणाले ॲड.असीम सरोदे ?
ॲड.असीम सरोदे यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर सुप्रीम कोर्टाच्या एक नोटीशीचा फोटो टाकत त्यासोबत भली-मोठ्ठी पोस्ट लिहीली आहे. त्यांची पोस्ट जशीच्या तशी –
सर्वोच्च न्यायालायने आज मूळ शिवसेना पक्षाची सुनावणी सुरु करू असे मागच्या तारखेला सांगून ठेवले होते. अगदी कुणी किती वेळ युक्तिवाद करणार हे सुद्धा सांगितले होते.
आज 11.30 वाजता मूळ शिवसेना आणि मूळ राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या प्रकरणांवर सुनावणी सुरु केली तरच निदान सुरुवात होऊन उद्या सुनावणी पुढे राहण्याची शक्यता आहे.
(*जरी आता राष्ट्रवादीचा वाद ते आपसात सोडविण्याची तयारी करीत आहेत असे त्यांच्या आपसातील वागणुकीवरून आणि घडामोडींवरून दिसते तरीही शरद पवार साहेबांनी सुप्रीम कोर्टातील याचिका परत काढून घेईपर्यंत त्यांचे राष्ट्रवादी पक्ष पळविण्याबाबतचे प्रकरण बोर्डवर येत राहिलच).
परंतु आज दुपारी एक वाजेपर्यंतच चीफ जस्टीस सूर्यकांत त्यांच्या नियमित कोर्टातील कामकाज करतील कारण दुपारी एक वाजतापासून चीफ जस्टीस आणि न्या. जोयमाला बागची यांच्यासोबत गठीत करण्यात आलेल्या विशेष न्यायालयाचे कामकाज करतील. अरावली डोंगर रांगांबाबत 100 मीटर उंचीच्या पेक्षा जास्त असतील त्यांनाच डोंगर मानणार असा अहवाल सरकारतर्फे कोर्टात दाखल झाला व त्याला तत्कालीन चीफ जस्टीस भूषण गवई साहेब यांनी मान्यता दिली. तो निर्णय पर्यावरण विरोधी असल्याबाबत केसेस वर आज तातडीची सुनावणी दुपारी एक वाजता होणार आहे.
त्यामुळे “शिवसेना सत्तासंघर्ष- पक्ष पळविणे, धनुष्यबाण चिन्ह” याबाबतची सुनावणी घेतली जाईल अशी आशा करता येणार नाही. – असे ॲड.असीम सरोदे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
त्यामुळेच धनुष्यबाण आणि शिवसेना हे मूळ नाव शिंदेंना मिळणार की उद्धव ठाकरेंना, मूळ पक्ष कोणाचा , या सर्व गोष्टींचा निकाल आणखी लांबणीवर पडण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
