मोठी बातमी! …तर हे घडलंच नसतं, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावरून भुजबळांचा सरकारला घरचा आहेर, केली मोठी मागणी
कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनानंतर अखेर शनिवारी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे, यावर आता छगन भुजबळ यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली असून, यावरून त्यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.

नीट पेपर फुटीचं प्रकरण समोर आल्यानंतर संपूर्ण देशभरात असंतोषाचं वातावरण निर्माण झालं होतं. अभिजीत दिपके संस्थापक असलेल्या कॉकरोच जनता पार्टीकडून सातत्याने धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत होती. त्यासाठी त्यांनी दिल्लीच्या जतंर मंतर मैदानावर तब्बल एक महिना आंदोलन केलं. शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलकांकडून संसदेवर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चादरम्यान आंदोलक आणि पोलीस आमने-सामने आले. पोलिसांकडून आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या, तसेच यावेळी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज देखील केला. या घटनेत अनेक आंदोलक जखमी झाले, दरम्यान त्यानंतर आंदोलकांनी देखील पोलिसांवर दगडफेक केल्याचा आरोप होत आहे.
या घटनेमुळे देशभरात वातावरण चांगलंच तापलं. या आंदोलनाला विरोधी पक्षाचा देखील पाठिंबा मिळाला. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केलं. या सर्व पार्श्वभूमीवर दबाव वाढल्याने अखेर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आता शिक्षण मंत्रालयाची जबाबदारी प्रल्हाद जोशी यांच्याकडे देण्यात आली आहे. दरम्यान धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर आता मंत्री छगन भुजबळ यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे, त्यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे.
नेमकं काय म्हणाले भुजबळ?
जे घडलं ते सर्व तुमच्यासमोर घडलं आहे. परंतु जर धर्मेंद्र प्रधान यांनी आधीच राजीनामा दिला असता तर या सर्व गोष्टी घडल्याच नसत्या. पोलिसांचा लाठीचार्ज, त्यानंतर देशात पसरलेली संतापाची लाट या सर्व गोष्टी संपूर्ण जगाने पाहिल्या आहेत. जर त्यांनी आधी राजीनामा दिला असता तर हे घडलं नसतं. धर्मेंद्र प्रधान यांनी आता राजीनामा दिला आहे, परंतु तो त्यांनी 15 दिवसांपूर्वीच द्यायला पाहिजे होता. सरकारमधील ज्येष्ठ लोकांना यावर त्यांच्याशी आधीच चर्चा करायला पाहिजे होती.
सोनम वांगचूक यांना देखील 26 दिवस उपोषण करावा लागलं. ज्या घटना या काळात घडत होत्या त्यामुळे लोकांच्या मनात तीव्र संतापाची लाट पहायला मिळाली. आता हा संताप शांत करण्याचं काम झालं पाहिजे, सर्वांशी संवाद साधण गरजेचं आहे, असं यावेळी भुजबळ यांनी म्हटलं आहे.