
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामुळे राज्य सरकारवर मोठी टीका केली जात आहे. अशोक खरातने मंत्र-तंत्रविद्येच्या नावाखाली अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे म्हटले जात आहे. तसे काही धक्कदायक व्हिडीओदेखील समोर आले आहेत. विशेष म्हणजे हा भोंदूबाबाची अनेक मंत्री, बड्या नेत्यांसोबत उठबस होती. हे प्रकरण समोर आल्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचार राजीनामा द्यावा लागलेला आहे. या सर्व घडामोडी घडत असताना आता विरोधकांनी मोठी मागणी केली आहे. खरातसोबत ज्यांचे फोटो आहेत, अशा सर्वच मंत्री, नेत्यांविरोधात कारवाई करावी, अशी मागणी विरोधकांनी केली आहे. सोबतच या प्रकरणात एचआयव्ही चाचणीचाही थेट सभागृहात उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे आता वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.
विधानसभेत भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावर चर्चा चालू असताना काँग्रेसने स्थगन प्रस्ताव आणला. त्यानंतर काँग्रेसचे नेते नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार यांनी सरकारला चांगलेच घेरले. भोंदूबाबाला जे-जे भेटले आहेत, जे व्हिडीओ क्लीपमध्ये आले आहेत. व्हिडीओमध्ये आले आहेत त्या सर्वांच्या मोबाईलचे सीडीआर तपासले पाहिजेत, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली. तसेच या भोंदूबाबाला जे जे भेटले आहेत त्या सर्वांची एचआयव्ही टेस्ट करून घ्यायला हवी, असे म्हणत सरकारनेच या चाचण्या करून घ्यायला हव्यात. नाहीतर सगळेच संसर्गान मरतील, अशी चिंताही व्यक्त केली.
याच प्रकरणावर बोलताना भोंदूबाबासोबत ज्यांचे-ज्यांचे फोटो आले आहेत, त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी नाना पटोले यांनी केली. तर ठाकरे गटाचे नेते तथा आमदार भास्कर जाधव यांनीही या प्रकरणावर बोलताना संताप व्यक्त केला. या प्रकरणात सगळ्याच पक्षाचे लोकप्रतिनिधी आहेत. मी कुठल्याही एका पक्षावर बोलत नाहीये. या भोंदू बाबाचे मुत्र प्यायला जात आहेत. त्यांना लाज वाटत नाही. या पुरोगामी महाराष्ट्रात असे उद्योग करायला लाज वाटत नाही का? असा रोखठोक सवाल भास्कर जाधव यांनी केला.
या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकाची भूमिका मांडली. या प्रकरणी कारवाई आता झालेली असली तरी त्या कारवाईची तयारी आधीपासूनच केली जात होती. हा राजकारणाचा विषय आहे. मी नेहमी क्लीनचिट देत नाही. जो क्लीन असतो त्यालाच क्लीनचिट मिळते. या प्रकरणात तर एखाद्याचा दुरान्वयानेही संबंध असेल तर त्याला सोडले जाणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. हा महिलांच्या सन्मानाचा प्रश्न आहे. वेगळ्या शक्ती आहेत, असे सांगून महिलांचे ब्रेनवॉश करण्यात आले, असेही फडणवीस यांनी सभागृहात सांगितले.