राज्यमंत्र्यांना बैठका घेण्याचा अधिकार आहे की नाही? मिसाळ, शिरसाट वादावर फडणवीसांचं मोठं वक्तव्य

राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विभागीय आढावा बैठक घेतली होती, यामुळे संजय शिरसाट यांनी नाराजी व्यक्त केली, त्यावर मिसाळ यांनी शिरसाट यांना एक पत्र लिहिलं, यावर आता फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राज्यमंत्र्यांना बैठका घेण्याचा अधिकार आहे की नाही? मिसाळ, शिरसाट वादावर फडणवीसांचं मोठं वक्तव्य
| Updated on: Jul 27, 2025 | 6:14 PM

सामाजिक न्याय विभागाच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट यांच्या परवानगीशिवाय विभागीय आढावा बैठक घेतली होती, यामुळे संजय शिरसाट यांनी नाराजी व्यक्त केली, त्यानंतर माधुरी मिसाळ यांनी शिरसाट यांना पत्र पाठवत, राज्यमंत्री म्हणून आपल्याला अशा बैठका घेण्याचा अधिकार असल्याचं म्हटलं होतं. या पत्रामुळे महायुतीच्या मंत्र्यांमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला होता, यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

नेमकं काय म्हणाले फडणवीस? 

मिसाळ यांनी ज्या पद्धतीनं पत्र लिहिलं, त्या पत्रामुळे कॅबिनेट आणि राज्यमंत्र्यांमधील वाद उघडपणे बाहेर आला आहे, त्यामुळे राज्य मंत्र्यांना अधिकार बाहाल करण्यासंदर्भात प्रश्न उपस्थित झाला आहे, असा प्रश्न यावेळी फडणवीस यांना विचारण्यात आला, यावर उत्तर देताना फडणवीस यांनी म्हटलं की, ‘पहिली गोष्ट तर मला असं वाटतं की अशापद्धतीनं पत्र लिहून कोणीही वाद तयार करू नये, मंत्र्यांनी आपआपसात बोलावं, आणि त्यांना काही समस्या असतील तर त्या त्यांनी मला येऊन सांगाव्यात. म्हणजे त्यातील अडचणी आपल्याला दूर करता येतील.

शेवटी राज्य मंत्री आणि कॅबिनेट मंत्री हे एकाच शासनाचे भाग असतात. सगळे अधिकार हे मंत्र्यांकडे असतात. मंत्री जे अधिकार देतात ते राज्यमंत्र्यांचे अधिकार असतात. त्यामुळे यामध्ये कुठलाही संभ्रम नाहीये, मात्र राज्य मंत्र्यांना बैठका घेण्याचा अधिकार नाही, असं मानणं ही चुकीचं आहे. राज्य मंत्र्यांना बैठका घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. पण अशा बैठकांमध्ये काही धोरणात्मक निर्णय असतील तर ते कॅबिनेट मंत्र्यांशी बोलल्याशिवाय घेता येत नाहीत, किंवा ते घेतले तर त्याला मंत्र्यांची मान्यता लागते. त्यामुळे मला असं वाटतं की राज्यमंत्री आणि मंत्री या दोघांनी सामंजस्य दाखवलं पाहिजे, असं यावेळी फडणवीस यांनी म्हटलं आहे.

दरम्यान फडणवीस यांनी यावेळी बोलताना मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीवर देखील प्रतिक्रिया दिली आहे.

‘उद्धवजींचा जन्मदिवस आहे, त्यांना शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे गेले आनंदाची गोष्ट आहे, यामध्ये कशाला राजकारण आणायचं. आमच्याही शुभेच्छा आहेत, सर्वांच्याच उद्धवजींना शुभेच्छा आहेत. वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी जाणं  यात राजकारण पाहाणं हे काय योग्य नाहीये, असं फडणवीस यांनी यावेळी म्हटलं.

दरम्यान पुढे बोलताना फडणवीस असंही म्हणाले की,  महाराष्ट्राच्या मनात काय आहे, हे तुम्हाला विधानसभा निवडणुकीत दिसलं, आणि महाराष्ट्राच्या मनात काय आहे, हे तुम्हाला ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, त्यातही दिसेल. आता काही पक्षांच्या नेत्यांच्या मनात काय आहे? ते महाराष्ट्राच्या मनातलं आहे, असं म्हणणं काही योग्य नाहीये. ते फार मोठं स्टेटमेंट होईल, असं म्हणत त्यांनी यावेळी ठाकरे गटाला पुन्हा एकदा डिवचलं आहे.