
कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील अर्दाळ गावात घडलेल्या एका अनोख्या घटनेने सर्वांनाच आश्चर्य आणि कौतुकाचा धक्का दिला आहे. शांताबाई यादव यांच्या घरी पाळीव कुत्रीने शेळीच्या कमजोर पिलाला आपले दूध पाजून केवळ त्याचे प्राण वाचवले नाहीत, तर ममता आणि त्यागाची खरी शिकवण दिली आहे.

जन्मापासून कमजोर आलेले हे शेळीचे पिल्लू आजवर कुत्रीचे दूध पिऊनच जिवंत राहिले आहे. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर याबद्दल लाखो लोकांनी प्राण्यांमधील माणुसकी जिवंत असल्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

शांताबाई यादव यांच्या शेळीला काही दिवसांपूर्वी तीन पिल्ले झाली. त्यातील दोन पिलं शारीरिकदृष्ट्या सक्षम असल्याने आईचे दूध सहज पित होती, मात्र तिसरे पिलं कमजोर असल्यामुळे ते पुरेसे दूध घेऊ शकत नव्हते.

आईचे दूध न मिळाल्याने या पिलाची तब्ब्येत झपाट्याने खालावत चालली होती आणि कुटुंबीय चिंतेत होते. अशा संकटकाळात घरात पाळीव कुत्रीने परिस्थिती ओळखली. या कुत्रीने देखील काहीच दिवसांपूर्वी पिल्लांना जन्म दिला होता.

या कुत्रीची पिल्ले काही लोक पाळण्यासाठी घेऊन गेले होते. त्यामुळे कुत्रीने मायेने शेळीच्या त्या कमजोर पिलाजवळ जाऊन त्याला दूध पाजायला सुरुवात केली. हे दृश्य पाहून उपस्थित सर्वांचे डोळे पाणावले होते.