डोंबिवलीत प्रसूतीनंतर महिलेच्या मृत्यूप्रकरणी मोठी अपडेट, चौकशी अहवालात धक्कादायक माहिती उघड
डोंबिवलीतील शास्त्री नगर रुग्णालयात प्रसूतीनंतर सुवर्णा सरोदे यांचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणी केडीएमसीच्या समितीचा अहवाल समोर आला आहे. अहवालानुसार, दोन डॉक्टर्स, संगीता पाटील आणि मिनाक्षी केंद्रे यांची सेवा खंडित करण्यात आली आहे. या दोघांनीही निष्काळजीपणा दाखवल्याचे अहवालात म्हटले आहे.

डोंबिवलीतील शास्त्री नगर रुग्णालयात प्रसूतीनंतर सुवर्णा सरोदे या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या प्रकरणात चौकशीसाठी दोन समित्या नेमण्यात आल्या होत्या. आता यात केडीएमसीच्या समितीचा अहवाल समोर आला आहे. या अहवालानंतर केडीएमसीने दोन डॉक्टरांची सेवा खंडित केली आहे. संगीता पाटील आणि मिनाक्षी केंद्रे अशी या दोन डॉक्टरांची नावे आहेत. या दोन्ही डॉक्टरांना आऊट सोर्सिंग पद्धतीवर कामावर घेण्यात आले होते.
गेल्या महिन्यात मोठागावमध्ये राहणाऱ्या सुवर्णा सरोदे (26) यांचा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल झाल्या. त्यानंतर पहिल्या सिझेरियन शस्त्रक्रियेनंतर दुसऱ्यांदा शस्त्रक्रिया करावी लागली. रात्री त्यांच्या प्रकृतीत बिघाड होऊ लागला. डॉ. मिनाक्षी केंद्रे या फोनवरून मार्गदर्शन करत होत्या. मात्र त्या प्रत्यक्ष उपस्थित नव्हत्या. रात्री उशिरा त्या महिलेची प्रकृती गंभीर झाली. त्यामुळे गर्भाशय काढण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, उपचारादरम्यान सुवर्णा सरोदे यांचा मृत्यू झाला.
प्राथमिक चौकशी अहवालात धक्कादायक माहिती उघड
सुवर्णा सरोदे यांचा सिझेरियन शस्त्रक्रियेनंतर मृत्यू झाल्याप्रकरणी प्राथमिक चौकशी अहवालात दोन स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टरांवर निष्काळजीपणाचा ठपका ठेवण्यात आला आहे. या घटनेच्या वेळी डॉ. मिनाक्षी केंद्रे रुग्णालयात अनुपस्थित होत्या. तर शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉ. संगीता पाटील यांनी त्यानंतर रुग्णालयात उपस्थित राहणे उचित ठरले असते, असा अहवाल उपायुक्त प्रसाद बोरकर समितीने दिला आहे.
डॉक्टरांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी
पालिका प्रशासनाने शास्त्रीनगर रुग्णालयात बाह्यस्त्रोत संस्थेकडून तज्ज्ञ डॉक्टरांची नेमणूक केली आहे. मेसर्स एमके फॅसिलिटीस सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेतून कार्यरत असलेल्या या दोन्ही डॉक्टरांवर आता निलंबनाची शिफारस करण्यात आली. विधीमंडळ अधिवेशनात आमदार गोपाळराव मते यांनी या प्रकरणातील दोषी वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. पालिकेच्या प्राथमिक चौकशी अहवालानंतर आता जिल्हा शल्य चिकित्सकांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. या घटनेनंतर सुवर्णा सरोदे यांच्या नातेवाईकांनी दोषी डॉक्टरांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. तसेच रुग्णालय प्रशासनाला धारेवर धरले.
गेल्या दोन दिवसांपासून याप्रकरणी नातेवाईक निषेध व्यक्त करत आहेत. आता, पालिका प्रशासनानेही डॉक्टरांवर कारवाई करण्याची शिफारस केली आहे. या प्रकरणी अधिकृत गुन्हा दाखल होतो का, याकडे लक्ष लागले आहे. या प्रकरणात जिल्हा शैल्यचिकित्सक समितीचा अहवाल घेणे अद्याप बाकी आहे त्यानंतर गुन्हा दाखल होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.