
रायगड जिल्ह्यातील लोणेरे येथे असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रविद्यानिकेत विद्यापीठात एक धक्कादायक आर्थिक घोटाळा उघडकीस आला आहे. विद्यापीठात ठेकेदार पद्धतीने काम करणाऱ्या एका लिपिकाने १२८ विद्यार्थ्यांची फसवणूक करून तब्बल १६ लाखांहून अधिक रकमेचा अपहार केल्याचे समोर आले आहे. सुमित अनिल जाधव असे अटक करण्यात आलेल्या लिपिकाचे नाव आहे. या घटनेने शैक्षणिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
रायगडच्या लोणेरे या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रविद्यानिकेतन येथे ठेकेदार पद्धतीने काम करणाऱ्या एका लिपिकाने १२८ विद्यार्थ्यांची फसवणूक केली आहे. या लिपिकाने तब्बल १६.३८ लाख रुपयांचा अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सुमित अनिल जाधव असे अटक करण्यात आलेल्या लिपिकाचे नाव आहे. या घटनेने शैक्षणिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमित अनिल जाधव सह्याद्री वसतिगृहात कंत्राटी लिपिक म्हणून कार्यरत होता. त्याने विद्यार्थ्यांकडून त्यांच्या शिष्यवृत्ती, फी आणि इतर विविध खर्चांच्या नावाखाली स्वतःच्या Google Pay खात्यावर सुमारे १५ लाख ७८ हजार ५०० रुपये जमा करून घेतले. यासाठी त्याने विद्यार्थ्यांची दिशाभूल केली. तसेच त्यांना काही ठिकाणी धमकीही दिली, असे तक्रारीत नमूद करण्यात आले.
याशिवाय, सुमित जाधवने विद्यापीठाच्या अधिकृत चेकशी (क्रमांक ८२१८७६) छेडछाड करून अतिरिक्त ६० हजार रुपयांचा अपहार केल्याचेही पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. मूळ चेकवर ६८९० रुपये नमूद असताना, त्याने त्यात फेरफार करून ६६,८९० रुपये स्वतःच्या खात्यात वळते केले. अशाप्रकारे त्याने एकूण १६ लाख ३८ हजार ५०० रुपयांची फसवणूक केली.
याप्रकरणी गुजरातमधील सुरत या ठिकाणी राहणारे प्रतिककुमार पुरानी या CA ने याबद्दल तक्रार केली आहे. या प्रकरणी त्यांनी १७ जुलै २०२५ रोजी रात्री ९:४६ वाजता गोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. ही तक्रार दाखल झाल्यानंतर अवघ्या दोन तासांत रात्री ११.३९ वाजता आरोपी सुमित अनिल जाधव याला अटक करण्यात आली. त्याच्यावर भारतीय दंड संहिता कलम ३२६(५), ३१८(२), ३१८(४), ३३८(२), ३५१(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी आरोपीला २१ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. या मोठ्या आर्थिक घोटाळ्यामुळे विद्यापीठातील प्रशासकीय कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.