
गेल्या काही दिवसांपासून अंमलबजावणी संचालनालय (ED) कडून सातत्याने विविध ठिकाणी छापेमारी केली जात आहे. आज पहाटे ईडीने बारामती आणि पुणे जिल्ह्यांमध्ये मोठी कारवाई केली आहे. विद्यानंद डेअरीशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार आणि गुंतवणूकदारांची तब्बल १०८ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी ही छापेमारी सुरू आहे. सध्या फरार असलेला आनंद सतीश लोखंडे हा या प्रकरणातील मुख्य आरोपी असून, तो आमदार रोहित पवार यांचा निकटवर्तीय असल्याचे बोललं जात आहे.
ईडीच्या पथकांनी पुणे जिल्ह्यामध्ये दोन ठिकाणी आणि बारामती तालुक्यात जळोची, खताळ पट्टा आणि झारगडवाडी यांसह तीन ठिकाणी एकाच वेळी शोधमोहीम सुरू केली. सध्या फरार असलेला आनंद सतीश लोखंडे आणि त्याची पत्नी विद्या लोखंडे यांच्याशी संबंधित मालमत्तांवर हे छापे टाकण्यात आले. हे दोघे या प्रकरणातील मुख्य आरोपी आहेत. लोखंडे याच्यावर विविध ठिकाणी मिळून १०८ कोटी रुपयांपेक्षा जास्त अपहार केल्याचे गुन्हे दाखल आहेत. शिवसेना शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांचे पुतणे विजय सुभाष सावंत यांनी 7 ऑक्टोबर रोजी वाघोली पोलीस ठाण्यात फसवणुकीची मुख्य तक्रार दाखल केली होती.
यावेळी आरोपींनी बारामती डेअरी प्रायव्हेट लिमिटेड आणि पुणे-मुंबईतील अनेक व्यावसायिकांना दुग्ध व्यवसायात गुंतवणुकीचे आमिष दाखवून 10 कोटींहून अधिक रुपयांना गंडा घातला आहे. याशिवाय, मुंबईतील एका कंपनीकडून 2 कोटी रुपयांचे लोणी आणि सुमारे 93 लाखांचे दूध खरेदी करून त्याचे पैसे थकवल्याचेही समोर आले आहे. या घोटाळ्याची व्याप्ती मोठी असून, यात शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यांवर पतसंस्थांचे कर्ज काढून फसवणूक करणे तसेच मंत्रालयातील काही वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांचीही गुंतवणुकीच्या नावाखाली फसवणूक केल्याची माहिती मिळत आहे.
या प्रकरणात आरोपी आनंद लोखंडे याचे राजकीय संबंधही तपासले जात आहेत. लोखंडे हा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांचा अत्यंत जवळचा कार्यकर्ता आणि निकटवर्तीय असल्याचे बोलले जात आहे. लोखंडे याने रोहित पवारांच्या विधानसभा मतदारसंघात शाळा बांधणे आणि गणवेश वाटणे अशा सामाजिक कामांवर कोट्यवधी रुपये खर्च केल्याची माहितीही समोर येत आहे. ईडीच्या या कारवाईमुळे लोखंडे आणि रोहित पवार यांच्यातील संबंधांवर प्रकाश पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच या राजकीय कनेक्शनमुळे तपासाची व्याप्ती वाढू शकते, असे बोललं जात आहे.