
मुसळधार पावसामुळे राज्यातील जनता अडचणीत सापडली आहे. पुरामुळे अनेकांचं घरदार उद्ध्वस्त झाले आहे. काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली, तसेच नागरिकांना खाद्यपदार्थ, कपडे आणि इतर वस्तूंची मदत केली होती. या मदतीच्या पॅकेटवरील फोटोंमुळे ठाकरे गटाने एक नाथ शिंदेंवर टीका केली होती. याला आता एकनाथ शिंदेंनी प्रत्युत्तर दिले आहे. एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले ते जाणून घेऊयात.
तुम्हाला फक्त आमचे फोटो दिसतात पण…
आपल्या भाषणात एकनाथ शिंदेंनी पूराच्या परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत करणाऱ्या शिवसैनिकांचे कौतुक केले आहे. विरोधकांच्या टीकेवर बोलताना एकनाथ शिंद म्हणाले की, ‘तुम्हाला फक्त आमचे फोटो दिसतात, त्याच्या आतमधील सामान दिसत नाही का? आम्ही याद्वारे 26 प्रकारच्या वस्तू दिल्या. यात गहू तांदूळ, डाळ, साखरेपासून, ब्लँकेट आणि लाडक्या बहिणींना साड्या असं सगळं दिलं आहे. तुम्ही एक बिस्किटचा पुडा तरी घेऊन गेलात का? तेवढा तरी न्यायचा होता, तेवढी तरी दानत दाखवायची होती.’
आमचे फोटो तुम्हाला दिसले, तुमचे फोटोही लावून आमचे कार्यकर्ते आपत्तीच्या वेळेस मदत करत होते. त्यावेळेस तु्म्हाला बरं वाटत होतं. चांगलं वाटतं होतं. फोटो लावतात कार्यकर्ते, पण त्याच्यावर खूप टीका केली. फोटोग्राफरला फोटोशिवाय काय दिसणार? फोटोच दिसणार ना? काही लोकं गेले, नौटंकी करून आले. आधी आमचे मदतीचे ट्रक गेले आणि नंतर एकनाथ शिंदे गेला.
पूरग्रस्त भागामध्ये साथीचे आजार पसरू नये म्हणून स्वच्छता मोहीम घेतली. डॉक्टरांच्या टीम गेल्या आहेत. त्यांना बळीराज्याच्या आरोग्याची तपासणी करण्यासाठी पाठवण्यात आले आहे. काही लोक हात हालवत गेले आणि तोंड वाजवत परत आले. आमच्यावर टीका करत आहेत. तुम्हाला काय अधिकार आहे? तुम्हाला एकच सांगतो. यांचे दौरे म्हणजे, खुद को चाहिये काजू बदाम, पाणी मैं उतरे ती सर्दी जुकाम अशी यांची अवस्था आहे. सर्वसामान्य माणूस हाच आमचा केंद्र बिंदू आहे, तोच आमचा आधार आहे. मी मुख्यमंत्री होतो तेव्हा मी म्हणालो होतो की मी कॉमन मॅन आहे, आता मी DCM म्हणजे डेडिकेटेड टू कॉमन मॅन आहे.
उद्धव ठाकरेंवर टीका करताना एकनाथ शिंदे म्हणाले की, ‘ते कुठेही गेले तर माझे हात खाली आहेत असं म्हणतात. माझ्याकडे काही नाही म्हणतात. कधी होतं? जेव्हा होतं तेव्हा पण नाही दिलं. आता पण नाही दिलं. उद्या पण देणार नाहीत. कारण देण्यासाठी दानत लागते दानत. या एकनाथ शिंदेचे दोन्ही हात देणारे आहेत. ही लेना बँक नाही देना बँक आहे.’