
Jain Boarding Scam : पुण्यातील जैन बोर्डिंग प्रकरण चांगलेच तापले आहे. शिंदे गटाचे नेते तथा माजी आमदार रविंद्र धंगेकर यांनी हे प्रकरण चांगलेच लावून धरले आहे. विशेष म्हणजे त्यांनी धंगेकर यांनी येत्या 27 ऑक्टोबर 2025 रोजीपासून जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द होईपर्यंत बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. त्यांनी भाजपाच नेते तथा केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचा या खरेदी प्रकरणात सहभाग असल्याचा दावा केला आहे. दरम्यान, धंगेकर यांच्या भूमिकेनंतर महायुतीची चांगलीच अडचण झाली आहे. महायुतीमध्ये एका प्रकारची ठिणगी पडल्यासारखे झाले आहे. असे असतानाच आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. त्यांनी धंगेकर यांना महत्त्वाचा सल्ला दिला आहे.
धंगेकर आज पुण्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी माध्यम प्रतिनिधींनी त्यांना काही प्रश्न विचारले. जैन बोर्डींगच्या प्रकरणावर त्यांनी भाष्य केले. धंगेकर यांना तुम्ही काही सल्ला दिला आहे का? असे विचारताच, मी त्यांना सांगितलं आहे की आपल्याला महायुतीमध्ये दंगा करायचा नाही. मी आता तो (जैन बोर्डिंगचा) विषय संपलेला आहे. धंगेकर यांना ज्या काही गोष्टींची माहिती मिळाली, त्यावरून ते बोलत होते, अशी माहिती शिंदे यांनी दिली. तसेच आपली महायुती आहे. आपल्याला विरोधकांच्या हातात कुठलेही कोलित द्यायचे नाही, असा सल्लाही धंगेकर यांना दिल्याचे शिंदे यांनी सांगितले.
पुढे बोलताना त्यांनी धंगेकर यांची स्तुती केली. रविंद्र धंगेकर हे लढणारे कार्यकर्ते आहेत. ते अन्यायाविरोधात लढत असल्याचे सांगत धंगेकर यांनी अगोदरच सांगितलेले आहे की माझी भारतीय जनता पार्टीला विरोध करण्याची अजिबात भूमिका नाही, असेही शिंदे यांनी यावेळी बोलताना सांगितले. जे काही प्रकरण सुरू होते तेही आता संपेल. या प्रकरणावर पडदा पडेल, अशी आशा शिंदे यांनी व्यक्त केली.
दरम्यान, आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धंगेकर यांनी उचललेला हा मुद्दा चांगलाच गाजला आहे. या मुद्द्याचा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर परिणाम पडण्याची शक्यता असल्याचे लक्षात येताच भाजपाने सावध पवित्रा घेतला आहे. शिंदे यांनीदेखील हा विषय संपला असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आता नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.