
Shiv Sena BJP Alliance : राज्यात एकूण 29 महानगरपालिकांसाठी येत्या 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीचा निकाल 16 जानेवारी रोजी जाहीर केला आहे. निवडणुकीच्या घोषणेनंतर आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. यावेळी मुंबई महापालिकेची निवडणूक इतर महापालिकांसोबतच होणार आहे. त्यामुळेच मुंबापुरीत विजयी पताका फडकवण्यासाठी सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. युती आणि आघाडी करण्यासाठी जागावाटपाची चर्चा चालू झाली आहे. एकीकडे आता मनसेचे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार आहेत. त्यांच्यात जागावाटपही पूर्ण झाले आहे. दुसरीकडे काँग्रेसने आपली वेगळी चूल मांडली असून या पक्षाची वंचित बहुजन आघाडीसोबत चर्चा चालू आहे. असे असतानाच आता भाजपा आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात युतीसाठी मोठ्या हालचाली वाढल्या आहेत. या दोन्ही पक्षांमध्ये जागावाटपावर चर्चा चालू आहे. परंतु ठाकरे गटाने जास्त जागांचा मुद्दा लावून धरल्यामुळे अजूनही भाजपा-शिवसेनेच्या युतीला अंतिम स्वरुप आलेले नाही. असे असतानाच आता शिंदे गटाचा गोटातून मोठी अपडेट समोर येत आहे. आता शिवसेनेच्या या भूमिकेमुळे मुंबई पालिकेच्या निवडणुकीच्या निवडणुकीत नेमकं काय होणार? असा प्रश्न उपस्थित झाला आहे?
मिळालेल्या माहितीनुसार मुंबई मनपा निवडणुकीत शिवसेना 112 जागा लढण्यावर ठाम आहे. काहीही झाले तरी आम्हाला 112 जागाच हव्या आहेत, अशी शिंदे गटाची भूमिका आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात काल (22 डिसेंबर) झालेल्या बैठकीतही या 112 जागांसाठीची आग्रह पाहायला मिळाला आहे.
सोबतच मुंबईतील मराठीबहुल भागामध्ये जास्तीत जास्त जागा द्याव्यात, अशी इच्छाही शिवसेनेने व्यक्त केली आहे. त्यामुळे 22 डिसेंबर रोजीच्या बैठकीत कोणताही तोडगा निघू शकलेला नाही. 23 डिसेंबर रोजी पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजपा नेत्यांमध्ये जागावाटपावर चर्चा होणार आहे. त्यामुळे यावेळी नेमका काय तोडगा निघणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
दरम्यान, आता दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्याने भाजपा आणि शिंदे यांच्या शिवसेनेपुढे नवे आव्हान उभे राहणार आहे. या आव्हानावर मात करण्यासाठी फडणवीस-शिंदे नेमकं काय करणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.