Eknath Khadse : ‘निखिल खडसे तुमच्या मुलाने काय पाहिलं की त्याला..’ शिंदेंच्या आमदाराचा एकनाथ खडसेंवर व्यक्तिगत पातळीवरचा अत्यंत गंभीर आरोप
Eknath Khadse : जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात एकनाथ खडसे हे मोठं प्रस्थ होतं. पण आता एकनाथ खडसे यांची राजकीय शक्ती मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. पण मुक्ताईनगरच्या राजकारणात अजूनही ते आपलं महत्व टिकवून आहेत. आता तिथे सुरु असलेलं आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण हे व्यक्तीगत पातळीवर पोहोचलं आहे.

रवी गोरे, प्रतिनिधी : मुक्ताईनगरचे शिवसेना आमदार चंद्रकांत पाटील आणि एकनाथ खडसे यांच्यात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपाची मालिका सुरु झाली आहे. “माझ्या मुलीविषयी का बोलतोय? खडसे वैफल्यग्रस्त झाला आहे. तुला पण मुली आहेत, जरा भान ठेव. याद राखा कुटुंबावर जात असाल तर घराबाहेर पडू देणार नाही” असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला. “माझ्या घरात तुम्ही बोलता. तुमच्या मुलाने निखिलने का जीवन संपवलं? एका मंत्र्यांने सांगितलं होतं, मी ज्यावेळेस गौप्यस्फोट करेल, तेव्हा खडसेंना तोंड दाखवायला जागा मिळणार नाही” असं चंद्रकांत पाटील बोलले आहेत. “निखिल खडसे तुमच्या मुलाने काय पाहिलं की त्याला जीवन संपवावं लागलं” असं चंद्रकांत पाटील बोलले. ‘आमदार चंद्रकांत पाटील यांची मुलगी नगराध्यक्ष आहे, एकही दिवस नगरपंचायतीला दिसत नाही’ असा आरोप खडसेंनी केला होता.
“आमदारानी निखिलच्या मृत्युची सीबीआय चौकशीची मागणी करावी आणि नगराध्यक्ष कुठेय सांगा, पाचशे रुपये बक्षीस मिळवा” असं एकनाथ खडसे यांनी आव्हान करत प्रत्युत्तर दिलं आहे. मुक्ताईनगरच्या राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. “आमदार चंद्रकांत पाटील यांनी निखिल खडसेंच्या मृत्यूची सीबीआय चौकशी मागणी करावी असं सागंत, नगराध्यक्ष कुठेय सांगा आणि 500 रुपये बक्षीस मिळवा” अशा शब्दात एकनाथ खडसे यांनी आमदार चंद्रकांत पाटील यांना लक्ष्य केलं.
त्यांच्या कुटुंबाबाबत माझ्याकडे बरीच माहिती
“आमदार सध्या घरच्या समस्यांमुळे उद्विग्न अवस्थेत आहेत. त्यांच्या कुटुंबाबाबत माझ्याकडे बरीच माहिती आहे. तुम्ही बाकीच्या गोष्टी काढाल, तर मीही काढणार” असा इशारा खडसे यांनी दिला आहे. दोन आठवड्यांपूर्वी एकनाथ खडसे यांच्या सूनबाई केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी चंद्रकांत पाटलांना उत्तर दिलं होतं. “जिल्हा बँक खडसे मुक्त करायचं हे आमदार चंद्रकांत पाटलांच्या हातात नाही. जे सभासद आहेत ते ठरवतील. मला निवडणुकीत उभं राहायचं आहे तर मी उभं राहणार. ते ठरवू शकत नाहीत की मी उभ़ राहायचं की नाही” असा स्पष्ट संदेश रक्षा खडसे यांनी दिला होता.