शिंदे गटाच्या वर्धापन दिनाचे पोस्टर समोर येताच खळबळ, त्या शब्दांमुळे सस्पेन्स वाढला, बंडखोर खासदार…

बंडखोरी केलेले ठाकरेंचे खासदार शिवसेनेच्या 60 व्या वर्धापन दिनीच शिंदे यांच्या पक्षात सामील होणार असे सांगितले जात होते. त्यासाठीच ऑपरेशन टायगर राबवले जात असल्याची चर्चा होती. सध्या मात्र कायदेशीर अडचण येऊ नये म्हणून खासदारांचा पक्षप्रवेश लांबू शकतो, असे सांगितले जात आहे.

शिंदे गटाच्या वर्धापन दिनाचे पोस्टर समोर येताच खळबळ, त्या शब्दांमुळे सस्पेन्स वाढला, बंडखोर खासदार...
eknath shinde party vardhapan din
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 18, 2026 | 6:46 PM

Eknath Shinde Shivsena Poster : उद्धव ठाकरे यांच्या पक्षात मोठी फूट पडली आहे. ठाकरेंचे एकूण 6 खासदार फुटले असून या खासदाराचा नवा गट लवकरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षात सामील होण्याची शक्यता आहे. ही बंडखोरी थोपवता यावी यासाठी ठाकरे गटाकडून प्रयत्न करण्यात आले. परंतु यात सध्यातरी कोणतेही यश आले नसल्याचेच दिसत आहे. ठाकरे यांच्या पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी आता बंडखोरी केलेल्या खासदारांना मतदारसंघात येऊ देऊ नका, असे आवाहन कार्यकर्त्यांना केले आहे. दरम्यान, एकीकडे खासदारांच्या बंडखोरीमुळे खळबळ उडालेली असताना आता एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या वर्धापन दिनाचे पोस्टर समोर आले आहे.

शिंदे यांच्या पक्षाच्या पोस्टरमध्ये नेमकं काय आहे?

एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या वर्धापनदिनाचे पोस्टर पाहून आता वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. या पोस्टरमध्ये जनात शिवसेना, मनात शिवसेना असे लिहिण्यात आले आहे. तसेच या फोटोमध्ये शिवसेनेचा डरकाळी फोडणारा सिंह, शिवसेना पक्षाचे निवडणूक चिन्ह दिसत आहे. तसेच बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे, छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटोही लावण्यात आला आहे. या पोस्टरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिदे यांचाही भाषण करतानाचा फोटो लावण्यात आला आहे.

एकनाथ शिंदे नेमकं काय बोलणार?

शिंदे यांच्या पक्षाच्या शिवसेनेचा वर्धापन दिन मुंबईतील गोरेगाव पूर्वमधील नेस्को सेंटर येथे होणार आहे. सायंकाळी पाच वाजता हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात एकनाथ शिंदे नेमकं काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ठाकरेंचे खासदार शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार का?

दुसरीकडे बंडखोरी केलेले ठाकरेंचे खासदार शिवसेनेच्या 60 व्या वर्धापन दिनीच शिंदे यांच्या पक्षात सामील होणार असे सांगितले जात होते. त्यासाठीच ऑपरेशन टायगर राबवले जात असल्याची चर्चा होती. सध्या मात्र कायदेशीर अडचण येऊ नये म्हणून खासदारांचा पक्षप्रवेश लांबू शकतो, असे सांगितले जात आहे. त्यामुळे येत्या वर्धापन दिनानिमित्त ठाकरेंचे बंडखोर खासदार शिंदे यांच्या पक्षात प्रवेश करणार का? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

Follow Us