
मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरु केलं. आज या आंदोलनाचा तिसरा दिवस आहे. अशातच आता सरकारकडून मनोज जरांगे पाटलांच्या मागण्यांवर विचार सुरु आहे. आज मराठा आरक्षण उपसमितीची बैठकही पार पडली. अशातच आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. एकनाथ शिंदे यांचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. आता ते तातडीने मुंबईच्या दिशेने रवाना झाले असल्याची माहिती समोर आली आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सातारा जिल्ह्यातील दरे या आपल्या मूळ गावी गेले होते. मात्र आता एकनाथ शिंदे यांनी आपले नियोजित कार्यक्रम रद्द केले असून ते मुंबईला रवाना झाले आहेत. मुंबईमध्ये असलेल्या बैठकीसाठी ते मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. ही बैठक मराठा आरक्षणाबाबत असल्याची माहिती समोर आली आहे. याआधी उपमुख्यमंत्री अजित पवार हेही मुंबईच्या दिशेने रवाना झाले होते.
मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे. आज सायंकाळी या आंदोलनाची मुदत संपली होती, मात्र मुंबई पोलिसांनी आणखी एका दिवसासाठी या आंदोलनाला परवानगी दिली आहे. आता उद्याही मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन सुरु राहणार आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांचे पथक, क्यूआरटी, आरएएफ तसेच विशेष दल सोमवारीही मुंबईत तैनात राहणार असल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबईत पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे आंदोलकांचे हाल होत आहेत. या पावसामुळे आंदोलकांचा मोठा लोंडा सीएसएमटी स्थानकात गेला. तसेच काही आंदोलकांनी आझाद मैदान परिसरात ताडपत्रीच्या खाली आसरा घेतला. या मुसळधार पावसामुळे आंदोलकांना त्रासाचा सामना करावा लागत आहे. आंदोलकांची सोय करण्याची विनंती प्रशासनाकडे करण्यात आली आहे.
खासदार सुप्रिया सुळे आज आझाद मैदानावर जरांगे पाटलांची भेट देण्यासाठी गेल्या होत्या. मात्र प्रकृती खालावल्यामुळे जरांगे पाटील यांनी सुळेंशी बोलण टाळलं. यानंतर बोलताना सुळे म्हणाल्या की, ‘जरांगे पाटलांना विकनेस आला आहे, कारण त्यांनी 4 दिवसांपासून काहीही खाल्लेल नाही.’ दरम्यान डॉक्टर जरांगेंच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत.