अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा आमदार म्हणतो, ‘साहेबांना विश्वासात घेऊन सगळं केलं पाहिजे ही अपेक्षा’ पण प्रत्यक्षात घडतय उलट
"दादांची उणीव भरून निघू शकत नाही. आम्ही पोरके झालो आहोत. या कुटुंबाने जर आम्हाला समजलं नाही, तर आमचं राजकारण संपेल" असं अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा आमदार म्हणाला.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित पवार यांचं तीन दिवसांपूर्वी विमान अपघातात निधन झालं. अजितदादा यांच्या अशा अकाली निघून जाण्याने अख्खा महाराष्ट्र हळहळला. अजूनही पवार कुटुंबिय, त्यांना मानणारा वर्ग या दु:खातून सावरलेला नाही. पण दुसरीकडे अजित दादांनंतर त्यांचा राजकीय वारसा पुढे कोण नेणार? उपमुख्यमंत्री पदी कोणाला मिळणार? राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला एकसंध कसं ठेवायचं? असे अनेक प्रश्न निर्माण झालेत. त्याची उत्तर आता हळूहळू मिळायला लागली आहेत. महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अजित पवार यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी संभाळणार आहेत. त्यांची पक्षाच्या विधिमंडळ गटनेतेपदी निवड होऊ शकते. दरम्यान अजित पवार आणि शरद पवार यांच्या दोन्ही राष्ट्रवादीच्या आमदारांची इच्छा आहे की, पवार कुटुंबाने एकत्र यावं. दोन्ही राष्ट्रवादी एक व्हाव्यात. पण जमिनीवरील राजकारण मात्र थोड्या वेगळ्या दिशेने चाललं आहे.
“कोकाटे साहेबांचा निरोप आला. पत्रकार परिषदेला या. रात्री साडेआठ वाजता मला मंत्रालयातून बैठकीसाठी फोन आला. मी झिरवळ साहेबांना विचारले तर त्यांनी जावं लागेल सांगितलं. तातडीने का आणि कसे निर्णय घेतले हे त्यांनाच माहीत. पण पवार कुटुंबियांना दिलासा मिळावा म्हणून बहुतेक ही बैठक बोलावली असेल” असं अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार हिरामण खोसकर म्हणाले. “सामान्य कुटुंब देखील सांगत आहेत, सुनेत्रा पवारांना जर पद दिलं तर तीच दादांना श्रद्धांजली असेल. दादांची उणीव भरून निघू शकत नाही. आम्ही पोरके झालो आहोत. या कुटुंबाने जर आम्हाला समजलं नाही, तर आमचं राजकारण संपेल” असं हिरामण खोसकर म्हणाले.
शपथविधी झाल्यानंतर बहुतेक एकत्र बसतील
“मला तर आमदारकीसाठी शरद पवारांनीच दादांकडे पाठवलं. ताईंना कामाचा अनुभव आहेच. 40 वर्षांचा दादांचा अनुभव ताईंनी थोडा तर घेतला असेल. मला खूप आमदारांचे फोन आले की आपल्याला सुनेत्रा ताईंच्या पाठीशी राहायचे आहे. हीच खरी दादांना श्रद्धांजली असेल” असं हिरामण खोसकर यांनी सांगितलं. “सुनेत्रा ताईंचा शपथविधी झाल्यानंतर बहुतेक एकत्र बसतील. मी तर खूप ज्युनिअर आहे. पण साहेबांना विश्वासात घेऊन सगळं केलं पाहिजे ही अपेक्षा आहे” अशा अपेक्षा हिरामण खोसकर यांनी व्यक्त केल्या. पण आज सकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत ‘सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधीविषयी आपल्याला काहीच कल्पना नाही’ असं शरद पवार यांनी सांगितलं.
