धक्कादायक! महाराष्ट्रात गॅस सिलेंडर टंचाईचा पहिला बळी, रांगेत उभे असतानाच माजी सरपंच कोसळला

अकोल्यातील अन्वी मिर्झापूरचे माजी सरपंच शंकरराव शिरसाट यांना काल यदुराज #गॅस एजन्सीसमोर सिलिंडरसाठी रांगेत उभे असताना आपला जीव गमवावा लागला आहे.

धक्कादायक! महाराष्ट्रात गॅस सिलेंडर टंचाईचा पहिला बळी, रांगेत उभे असतानाच माजी सरपंच कोसळला
LPG death
Image Credit source: Tv9 Marathi
| Updated on: Mar 29, 2026 | 10:15 AM

गेल्या 30 दिवसांपासून मिडल इस्टमध्ये मोठा संघर्ष सुरु आहे. अमेरिका आणि इस्त्रायलने इराणवर हल्ला करत सुरु केलेले युद्धाने आता घातक वळण घेतले आहे. एकही देश माघार घ्यायला तयार नसल्यामुळे जगभरात या युद्धाचे दुष्परिणाम पाहायला मिळत आहेत. या युद्धामुळे एलपीजी, पेट्रोल आणि तेलाच्या किंमती वाढताना दिसत आहेत. भारतात तर एलपीजी सिलेंडर मिळवण्यासाठी अनेकांची धडपड सुरु आहे. काही ठिकाणी सिलेंडरसाठी लांबच्या लांब रांगा पाहायला मिळाल्या. आता, राज्यात या गॅस सिलेंडर टंचाईचा पहिला बळी गेल्याचे समोर आले आहे. माजी सरपंचाचा रांगेत उभे असतानाच मृत्यू झाला आहे.

राज्यात गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे अनेक जिल्ह्यांत नागरिकांना सिलेंडर मिळवण्यासाठी प्रचंड रांगा लागत आहेत. एकीकडे प्रचंड उष्णता असताना दुसरीकडे सिलेंडरसाठी तासंतास रांगेत उभे राहावे लागत असल्याने नागरिकांमध्ये संताप वाढला आहे. या पार्श्वभूमीवर अकोला जिल्ह्यातील अन्वी मिर्झापूर येथे एक दुर्दैवी घटना घडली आहे. गॅस सिलेंडरच्या रांगेत उभे असताना एका वृद्ध व्यक्तीला अचानक चक्कर येऊन त्यांचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे, मृत व्यक्ती अन्वी मिर्झापूरचे माजी सरपंच शंकरराव शिरसाट होते.

नेमकं काय घडलं?

यदुराज गॅस एजन्सीवर सिलेंडरचा नंबर लावण्यासाठी शंकरराव शिरसाट रांगेत उभे होते. अचानक त्यांना चक्कर आली आणि ते खाली कोसळले. घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, गॅस पुरवठ्यातील तुटवडा आणि प्रशासनाच्या नियोजनशून्यतेविरुद्ध नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. अन्वी मिर्झापूर गावावर शोककळा पसरली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी या प्रकरणी पोस्ट करुन सरकारला टोला लगावला आहे. “जे लोक सांगतात ना की राज्यात मुबलक गॅस सिलिंडर आहेत.‌ त्यांना जरा हा फोटो दाखवा! अकोल्यातील अन्वी मिर्झापूरचे माजी सरपंच शंकरराव शिरसाट यांना काल यदुराज #गॅस एजन्सीसमोर सिलिंडरसाठी रांगेत उभे असताना आपला जीव गमवावा लागला आहे. सिलिंडर बूक करा, २५ दिवसात येईल असं वर तोंड करून सांगणाऱ्या आमदार मॅडमने शिरसाट कुटुंबीयांची सर्वात आधी माफी मागायला हवी” असे त्यांनी म्हटले आहे.

प्रकाश आंबेडकरांची सरकारवर टीका

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले, “गॅस सिलेंडरचा तुटवडा होणार असल्याची पूर्वसूचना होती. तरीही शासनाने योग्य नियोजन केले नाही. वेळीच उपाययोजना केल्या असत्या तर शंकरराव शिरसाट यांचा जीव वाचला असता.”

Follow Us