ओबीसींसाठीच्या राखीव जागांवरील निवडणुकांना स्थगिती, न्यायालयाच्या आदेशानंतर निवडणूक आयोगाचा निर्णय

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 21 डिसेंबर 2021 रोजी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक आणि पोटनिवडणुकांतील मागासवर्ग प्रवर्गाच्या जागांवरील निवडणुकांना स्थगिती देण्यात आली आहे. तशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज दिली.

ओबीसींसाठीच्या राखीव जागांवरील निवडणुकांना स्थगिती, न्यायालयाच्या आदेशानंतर निवडणूक आयोगाचा निर्णय
ELECTION
| Edited By: | Updated on: Dec 07, 2021 | 5:07 PM

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 21 डिसेंबर 2021 रोजी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक आणि पोटनिवडणुकांतील मागासवर्ग प्रवर्गाच्या जागांवरील निवडणुकांना स्थगिती देण्यात आली आहे. तशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज दिली.

सार्वत्रिक निवडणुकांसाठी 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान

मदान यांनी सांगितले की, राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार राज्यातील 106 नगरपंचायती, भंडारा व गोंदिया जिल्हा परिषद आणि त्यांतर्गतच्या 15 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान होणार आहे. त्याचबरोबर चार महानगरपालिकांतील 4 रिक्तपदांच्या आणि 4 हजार 554 ग्रामपंचायतींतील 7 हजार 130 रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठीदेखील 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयात दाखल याचिकांच्या अधीन राहूनच या निवडणुका जाहीर करण्यात आल्या होत्या.

निवडणूक पूर्व घोषित कार्यक्रमानुसार पुढे सुरू राहील

सर्वोच्च न्यायालयाच्या 6 डिसेंबर 2021 च्या आदेशानंतर आता या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागांवरील निवडणुका आहे त्या टप्प्यावर स्थगित करण्यात आल्या आहेत. परंतु अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि सर्वसाधारण जागांसाठीची निवडणूक पूर्व घोषित कार्यक्रमानुसार पुढे सुरू राहील. नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग जागांच्या स्थगित निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या पुढील आदेशानुसार आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असेही मदान यांनी सांगितले.

नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागा

• भंडारा व गोंदिया जिल्हा परिषद- 23 (एकूण जागा 105)

• भंडारा व गोंदियातील 15 पंचायत समित्या- 45 (एकूण जागा 210)

• राज्यातील 106 नगरपंचायती- 344 (एकूण जागा 1,802)

• महानगरपालिका पोटनिवडणुका- 1 (एकूण 4 जागा)

इतर बातम्या :

Nitin Raut: मुलासाठी महावितरणची यंत्रणा वेठीस, नितीन राऊतांनी राजीनामा द्यावा; भाजपची मागणी

OBC Reservation: केंद्राने राज्याला ओबीसीचा इम्पिरिकल डेटा द्यावा; सुप्रिया सुळेंची लोकसभेत मागणी

Gopichand Padalkar: बैलगाडी शर्यतीसाठी पुन्हा मैदानात उतरुन सरकारची पळता भुई थोडी करु, गोपीचंद पडळकरांचा इशारा