प्रशांत किशोर यांच्याबद्दल तटकरे पहिल्यांदाच बोलले, म्हणाले…
राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं. यावर प्रतिक्रिया देताना आता तटकरे यांनी मोठं विधान केलं आहे.

राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं. दरम्यान त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आज पत्रकार परिषद घेतली आहे. या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी या भेटीबद्दल मोठं विधान केलं आहे. प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हे मलाच माहिती नाही, असं तटकरे यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाले तटकरे?
प्रशांत किशोर यांना राजकीय सल्लागार नेमल्याची माझ्याकडे माहिती नाही, पण जर त्यांची राजकीय सल्लागार म्हणून नियुक्ती झाली असती तर मला त्याची नक्की माहिती असती. दुसरं महत्त्वाचं म्हणजे राज्य नेतृत्वामध्ये त्यांचा सल्ला वगैरे याचा काही प्रश्नच येत नाही. कारण आम्ही एनडीएमध्ये सहभागी होत असताना सर्वांनी मिळून हिरहिरीने तो निर्णय घेतला. तो निर्णय घेतल्यानंतर तो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी घेतलेली प्रचंड मेहनत आम्ही पाहिली, त्यातून आम्हाला यश प्राप्त झालं. त्यामुळे पक्षात दोन मतप्रवाह वगैरे वगैरे ही चर्चा गैरवाजवी आहे, त्यामध्ये वेगळा अर्थ असण्याचं काही कारणच नाही, असं यावेळी तटकरे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, माझ्याबद्दल नाराजगी आहे, अशा तुमच्या ज्या काही बातम्या सांगतात, त्यामुळे तुमचं सूत्र काय सांगतं ते मला माहिती नाही, पण मला माझं गोत्र माहीत आहेना. अख्खा महाराष्ट्र ज्या नेत्यांनी पालथा घातला, त्या मोजक्या नेत्यांपैकी मी एक आहे. मी सलगपणे राज्यातील मतदारसंघ सांगू शकतो, मला सगळी माहिती आहे. त्यामुळे कोणाला काय वाटतं? इतपत विचार करण्यासारखी सध्याची स्थिती नाहीये. मी 41 वर्ष राजकारणात आहे. माझी राजकारणाची सुरुवात ही काँग्रेसचा रोहा तालुका सरचिटणीस म्हणून 1985 ला झाली. मला 85 साली विधानसभेचं तिकीट मिळालं. त्यामुळे माझा 41 वर्षांचा राजकीय प्रवास असाच झालेला नाहीये. मी सलग 41 वर्षीय राजकीयदृष्ट्या अति संवेदनशिल असलेल्या जिल्ह्यात काम करत आहे, म्हणजे थोडं फार काही तरी असेलच ना? असं यावेळी सुनील तटकरे यांनी म्हटलं आहे.